माझी वसुंधरा अभियानात संगमनेर नगरपरिषदेला विभागस्तरावरील प्रथम पुरस्कार

माझी वसुंधरा अभियानात संगमनेर नगरपरिषदेला विभागस्तरावरील प्रथम पुरस्कार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

माझी वसुंधरा अभियान 2.0 मधील नगरपरिषद गटांमधील नाशिक विभाग स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार संगमनेर नगरपरिषदेने पटकाविला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संगमनेर नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा काल रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी कार्यालय अधीक्षक राजेश गुंजाळ, सफाई कामगार श्रीमती बिनाबाई जेधे, स्वच्छता निरीक्षक अरविंद गुजर, नोडल अधिकारी सुनील गोरडे, सतीश बुरुंगुले उपस्थित होते.

संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व त्यांच्या सहकार्‍यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीमुळे आज हा सन्मान प्राप्त झाला आहे. यात संगमनेर परिसरातील स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांचेच योगदान ही महत्त्वाचं आहे. या सर्व घटकांच्या मेहनतीचं फलित म्हणजे आजचा हा सन्मान आहे. अशी प्रतिक्रिया प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली आहे.

या कामांसाठी मिळाला संगमनेर नगरपरिषदेला पुरस्कार

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, व नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेने शहराचे हरित अच्छादान वाढविण्याच्या दृष्टीने वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन संवर्धन करण्यात येत आहे. यापैकी जास्तीत जास्त भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. संगमनेर शहरातील वृक्ष गणना केली आहे. हेरिटेज वृक्षांचे सर्वेक्षण व जिओ टॅग करण्यात आले आहेत. त्यानूसार, संगमनेर शहरात एकूण वृक्ष 23650 व 213 हेरिटेज वृक्ष आढळून आले आहेत. संगमनेर शहरातील अकोले बाय पास रोड वरील बी.एड. कॉलेज चौक येथे पंचतत्व चौक असे नाव देण्यात येऊन व पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश या तत्वांचे लोगो उभारण्यात आलेले आहेत. शहरातील 2 विहिरींचे कायाकल्प करण्यात आलेला आहे. शासकीय इमारतीचे एनर्जी ऑडिट व जल परिक्षण करण्यात आले आहे.नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारती वर सोलर पॅनल बसवून वीजेची 95 टक्के बचत करण्यात आली आहे. शहर धूळ मुक्त करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा व दुभाजकामध्ये वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. शहरातील जनता नगर शाळा व संत रोहिदास उद्यान येथे मिया-वाकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. 2 ठिकाणी सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. यासारख्या पर्यावरण संवर्धनाच्या कामांसाठी संगमनेर नगरपरिषदेचा विभागीय स्तरावरील प्रथम पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com