‘माझी वसुंधरा अभियानात’ पाच ग्रामपंचायती अव्वल

वाघोली, गणोरे, मढी, सोनई, मिरजगावचा समावेश || महानगरपालिका सर्वोत्तम
‘माझी वसुंधरा अभियानात’ पाच ग्रामपंचायती अव्वल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

‘माझी वसुंधरा अभियान टप्पा- 2’ अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नि व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील वाघोली (ता. शेवगाव), गणोरे (ता. अकोले), मढी (ता. पाथर्डी), सोनई (ता. नेवासा), मिरजगाव (ता. कर्जत) या ग्रामपंचायतींनी राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. संबधित ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ यांच्यासह जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

स्पर्धेचा सन्मान सोहळा रविवार, 5 जून रोजी सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींच्या उपस्थितीत मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

5 जून, 2021 पर्यावरण दिनापासुन ‘माझी वसुंधरा अभियान टप्पा- 2’ अभियान सुरू झाले. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 574 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. या ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमाव्दारे जनजागृती, विविध स्पर्धांचे आयोजन, माहिती शिक्षण सवांदाचे उपक्रम राबवुन माझी वसुंधरा अभियानाबाबत वर्षभर जनजागृती करण्यात आली. राज्यस्तरावरून 574 ग्रामपंचायतींपैकी 77 ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. त्यापैकी जिल्ह्यातील वाघोली, गणोरे, मढी, सोनई, मिरजगाव या ग्रामपंचायतींने राज्यात अव्व्ल क्रमांक मिळविला आहे.

महानगरपालिका सर्वोत्तम

माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेत अमृत सिटी गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या शहरांमध्ये अहमदनगर महानगरपालिकेचा समावेश झाला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत अहमदनगर महापालिकेने पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी ऊर्जा बचत करणारे पथदिवे, सौर ऊर्जा प्रकल्प, वृक्षगणना, पुरातन प्राचीन वृक्ष जतन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी लेखा परीक्षण, ऊर्जा लेखा परीक्षण, उद्यान निर्मिती, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, भिंतीचे रंगकाम, सुशोभिकरण, इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देणे, चार्जिंगची व्यवस्था करणे या योजनांवर प्रभावी काम केले. त्याची दखल घेत अहमदनगर महापालिकेचा सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या शहरांमध्ये समावेश झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com