श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

केंद्र सरकारने शेतकर्यांच्या पिकांना किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील उत्पादित शेतमालाला हमी भाव जाहीर आहेत.

आता श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी मका विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन येतात. मात्र, केवळ 1 हजार 400 रुपये क्विंटल एवढा भाव मिळत आहे. केंद्र सरकारने मकासाठी आधारभूत किंमत 1 हजार 850 रुपये प्रतिक्विंटल ठरवली आहे. यासाठी आधारभूत केंद्र श्रीगोंद्यात बुधवार रोजी सुरू झाले. केवळ दोन शेतकर्यांची मका केंद्रावर आली आणि याच दिवशी सरकारचे मका खरेदीचे उद्दिष्ट संपले असल्याने शेतकरी आता पुन्हा कधी खरेदी सुरू होणार याकडे लक्ष लावून राहिले आहेत.

केंद्र सरकार विविध शेत मालाची आधारभूत किंमत ठरवते. यानुसार शेतकर्यांच्या मालाला बाजारात जर कमी भाव मिळत असेल तर किमान आधारभूत खरेदी केंद्रामार्फत शेतमालाची खरेदी करण्यात येते. यासाठी अगोदर पिकांची नोंदणी केली जाते.आधारभूत केंद्र तालुक्यात सुरू केले जाते. श्रीगोंदा तालुक्यात देखील तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, मका या शेतमालाचे आधारभूत खरेदी केंद्र यापूर्वी सुरू होते. यावर पुरवठा विभाग, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे लक्ष होते.

श्रीगोंदामध्ये चालू महिन्यात तालुका खरेदी-विक्री संघाला आधारभूत केंद्र मिळाले आहे. त्यांनी अनेक दिवस प्रयत्न करून आधी मका खरेदी करायला गोडाऊन उपलब्ध झाले नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांना महसूल विभागाने गोडाऊन दिले. त्यानंतर मका खरेदी केंद्र बुधवारी सुरू केले आणि या केंद्रात केवळ दोनच शेतकर्यांची मका खरेदी झाल्यावर त्यांना मका खरेदी करायचे उद्दिष्ट संपले असल्याचा मॅसेज आला.

तालुक्यातील मकाचे क्षेत्र मोठे आहे.किमान तीनशे ते चारशे शेतकरी हमी भावाने मका विक्रीसाठी थांबले असताना सरकारने खरेदीचे लिमिट संपले असल्याचे सांगितल्याने आता पुन्हा सरकारचा नवीन आदेश कधी येतो आणि पुन्हा खरेदी कधी सुरू होणार याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.

खरेदी केंद्र सुरू व्हायला उशीर

मागील दोन महिन्यांपासून मका बाजारात विक्रीसाठी येत आहे.हमी भावापेक्षा पाचशे रुपये कमी भाव व्यापारी देऊन मका खरेदी करत होते. बाकीच्या तालुक्यातील खरेदी केंद्र सुरू होऊन 20 ते 25 दिवस झाले. मात्र, श्रीगोंदा तालुक्यातील केंद्र सुरू व्हायला प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईने उशीर झाला आहे. यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.