विरोधकांचा अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याचा उत्साह उघड - परजणे

विरोधकांचा अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याचा उत्साह उघड - परजणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आणि जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच कोपरगाव तालुक्यातील 3418 कर्जदार शेतकर्‍यांना महाराष्ट्र सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे. याबाबतीत विरोधकांनी फुकटचे श्रेय घेऊ नये.

विनाकारण कागदपत्र जमा करण्याचे संदेश पसरून शेतकरी आणि जनतेत संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी आणि त्यांचे लाभार्थी यांनी खरे अज्ञान कुणाचे हे आता उघड झाले आहे. त्यामुळे भविष्यात असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याचा अतिघाईचा प्रकार विरोधकांनी करू नये असा टोला संवत्सर ग्रामपंचायतचे सदस्य महेश परजणे यांनी काळे कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे यांना लगावला आहे.

दिलीपराव बोरनारे यांनी विवेक कोल्हे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना महेश परजणे यांनी म्हटले आहे, आमदार आशुतोष काळे यांना एकही बाबतीत ठोस काम करण्यात यश आलेले नाही. वैफल्यग्रस्त मानसिकतेमुळे त्यांचे पदाधिकारी कोल्हे कुटुंबावर टीका करण्यात रस घेत आहेत. कर्जबाजारी शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतरच या योजनेला खर्‍या अर्थाने गती मिळाली आहे.

जिल्हा बँकेसह विविध राष्ट्रीयीकृत बँकांकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हा बँक आणि विविध राष्ट्रीयीकृत बँकांकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या कोपरगाव तालुक्यातील एकूण 7 हजार 477 शेतकर्‍यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात कोपरगाव तालुक्यातील 1 हजार 323 शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे.

दुसर्‍या टप्प्यात 2 हजार 95 शेतकर्‍यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. कोपरगाव तालुक्यातील कर्जदार शेतकर्‍यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान त्वरित मिळावे, यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

त्याची फलश्रुती म्हणून कोपरगाव तालुक्यातील 1323 शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले असून आता दुसर्‍या टप्प्यात तालुक्यातील 2095 शेतकर्‍यांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान वितरण करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. या अनुदानापासून वंचित असलेल्या उर्वरित 4059 शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांच्याकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.

कर्जदार शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली असून यामध्ये आमदारांचे कवडीचेही योगदान नाही. प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यास पात्र असणार्‍या शेतकर्‍यांचे अर्ज भरून घेण्याचा निव्वळ फार्स करणार्‍या आणि काहीही ठोस काम न करता उलट फुकटचे श्रेय घेण्याची सवय लागलेल्या मंडळींकडून अर्धवट माहितीच्या आधारावर चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करण्याचा खटाटोप सुरू आहे. तसेच शेतकर्‍यांची दिशाभूल केली जात आहे.

आम्ही खोट्या बातम्या प्रसिद्ध करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत नाही तर जनतेला शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने शासनदरबारी प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न यशस्वी होऊन जनतेला लाभ मिळतो ही वस्तुस्थिती आमदार काळे व त्यांचे अतिउत्साही पदाधिकारी यांना अज्ञानामुळे पचवणे कठीण जाते आहे, असा उपरोधिक टोला परजणे यांनी बोरनारे यांना लगावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com