माहेगावात सौभाग्यवतींच्या सरपंचपदासाठी पतीराज प्रयत्नशील

माहेगावात सौभाग्यवतींच्या सरपंचपदासाठी पतीराज प्रयत्नशील

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍यामाहेगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वच गट आपल्यापरीने भेटीगाठी घेत आहेत. सरपंचपद हे जनतेतून व सर्वसाधारण महिला राखीवअसल्याने इच्छुकांनी आपल्या सौभाग्यवतीला सत्तेच्या खुर्चीत बसविण्यासाठी ‘भगिरथ प्रयत्न’ सुरू केले आहेत.

माहेगावात स्थानिक सर्वच निवडणुका पारंपरिक दोन गटांत होत असतात. त्यामुळे आगामी होणारी ग्रामपंचायतीची निवडणूक चांगली गाजणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. हि निवडणूक तीन प्रभागांत होत असून सरपंच पद हे लोकनियुक्त असल्याने गावातील दोन्ही गट योग्य उमेदवाराच्या शोधात आहेत. तसेच प्रभागातील उमेद्वार प्रबळ देऊन सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेद्वाराला दगा फटका होणार नाही याची दक्षता दोन्ही गट घेत आहेत. सत्ताधारी आपला गड राखण्यासाठी जोरदार प्रयत्नात असून विरोधकांनीही चांगलीच फिल्डींग लावल्याचे समजते.

माहेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 1 हजार 414 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दोन्ही गटाची उमेद्वार चाचपणी सुरू असून इच्छूक मात्र आपापल्या प्रभागातील प्रत्येक कार्यक्रमांना हजेरी लावून तयारीला लागले आहेत. या निवडणुकीतमागील निवडणुकीतील जिरवाजिरवीचे राजकारण उद्यास येण्याची शक्यता बघायला मिळणार आहे. कोण कोणाच्या बाजूने उभे राहणार ? कोण कोणाकडे जाणार? त्यामुळे खरे चित्र 16 ऑक्टोबरनंतरच स्पष्ट होणार आहे.

राहुरी तालुक्यातील माहेगाव हे श्रीरामपूर मतदारसंघात येते. मात्र, येथील सर्व नागरिकांची शासकीय कामे ही राहुरीशी निगडीत आहेत. गावाला निधी आणण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींकडे जावे लागते. तालुका पातळीवर एक पक्ष तर मतदारसंघात दुसरा पक्ष अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे येथील राजकीय पुढार्‍यांची चांगलीच गोची होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com