
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
कांदा व कापूस पिकाला हमीभाव मिळत नाही, कृषीपंपाची वीज तोडली जाते आहे. गॅस सिलेंडर दिवसेंदिवस हणारी दरवाढ या विरोधात केंद्र व राज्य सरकार निषेध म्हणून येथील उपविभागीय कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठी घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोदंवण्यात आला.
आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना अद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवान दराडे, राष्ट्रवादी कांग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, कांग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख यांनी केले. यावेळी शेतकर्यांना नुकसान भरपाई, पिक विमा रक्कम मिळाली पाहिजे, गॅस सिलेंडरचे दर वाढवणार्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, केंद्र व राज्य सरकारचा करायचं काय खाली डोकं वर पाय, कापसाला, कांद्याल्या व ऊसाला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत पाथर्डी - नगर रस्त्यावर ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते अॅड. प्रताप ढाकणे, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, पांडुरंग शिरसाट, वैभव दहिफळे, चंद्रकांत भापकर, जालिंदर काटे, रविंद्र पालवे, देवा पवार, सिताराम बोरुडे, रामकिसन भिसे, भाऊसाहेब धस,उ ध्दव दुसंग, डॉ.राजेंद्र खेडकर, भाऊ तुपे, सदानंद राजाभाऊ, रविंद्र दिनकर, बाळासाहेब केंदळे, महारुद्र कीर्तने, योगेश रासने, अतिश निर्हाळी, अनिल ढाकणे, रत्नमाला उदमले, आरती निर्हाळी आदी सहभागी झाले होते.
यावेळी बोलतांना अॅड. ढाकणे म्हणाले, केंद्र सरकारच्या कृषिविषयक मालाच्या आयात निर्णयातीच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील आणि राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकर्यांच्या शेती मालाला हमी भाव मिळत नाही. शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील लोकांचे प्रतिनिधित्व करणार्या आमदारांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर विधिमंडळात एक शब्द सुद्धा काढला नाही हे मोठे दुर्दैव आहे.विकासाच्या बाबतीत रस्ते होतील जातील मात्र देशाचा पोशिंदा असणार्या शेतकर्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे ती होत नाही त्याबाबत लोकप्रतिनिधी कडून सध्याच्या परिस्थितीवर आवाज उठवला जात नाही.
तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्यावर लांब पर्यंत रांगा लागल्या होत्या.यावेळी कांदा व कापसाची माळ प्रांताधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर निषेध म्हणून बांधण्यात आली.