
लोणी |प्रतिनिधी| Loni
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील अबकारी कर कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले असून, आतातरी महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून व्हॅट कमी करण्याचे मोठे मन दाखवावे, असे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर कपात केल्याने पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट करून आ.विखे पाटील म्हणाले की, घरगुती गॅस सिलेंडर साठी 200 रुपये अनुदान देण्याच्या घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे उज्वला गॅस योजनेतील नऊ कोटी ग्राहकांना फायदा होणार असल्याचे समाधान व्यक्त केले आहे.
एकीकडे जागतिक स्तरावर खताचे दर वाढत असताना देशातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी खतावरील अनुदानाच्या रक्कमेत 1.10 लाख कोटी वाढवल्याने शेतकर्यांना स्वस्त दरात खरेदी करता येतील. शेतकर्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय खूपच महत्वपूर्ण असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.
देशातील जनतेकरीता केंद्र सरकारने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच महत्त्वपूर्ण निर्णय करून आपली बांधिलकी दाखवून दिली. मात्र राज्य सरकार फक्त केंद्रावर टिका करुन आपली जबाबदारी झटकते याकडे लक्ष वेधून केंद्राने निर्णय केला आता महाविकास. आघाडी सरकारने केंद्राच्या निर्णयाप्रमाणे व्हॅट कमी करण्यासाठी थोडे तरी मन मोठे करावे, असे आवाहनही आ. विखे यांनी केले.