महात्मा फुले विद्यापीठाचा शुक्रवारी राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत पदवीदान समारंभ

महात्मा फुले विद्यापीठाचा शुक्रवारी 
राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत पदवीदान समारंभ

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 36 वा पदवीदान समारंभ शुक्रवार 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आला आहे.

कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयासमोरील मंडपामध्ये ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने हा समारंभ होणार असून यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, कृषि मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते दीक्षान्त भाषण करणार आहेत.

नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी आणि महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानीत करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.

पदवीदान समारंभात गेल्या वर्षातील विविध विद्याशाखांतील 6 हजार 388 स्नातकांना पदवी, 382 स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर 62 स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित केले जाईल. यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर या समारंभात केवळ पारितोषिकेप्राप्त स्नातक व आचार्य पदवी स्नातक यांनाच प्रत्यक्ष मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. अन्य स्नातकांना संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन पध्दतीने अनुग्रहित करण्यात येणार आहे. पदवीदान समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या यूट्युब चॅनेल तसेच झुम लिंकवरुन केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com