तंत्रज्ञानाच्या वापराने कृषी उत्पादन वाढ शक्य - कुलगुरू

तंत्रज्ञानाच्या वापराने कृषी उत्पादन वाढ शक्य - कुलगुरू

राहुरी |तालुका प्रतिनिधी|Rahuri

हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रावर येणार्‍या नैसर्गिक समस्यांचे निवारण करण्यासाठी हवामान आधारित कृषीसल्ला सेवा या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास कृषी उत्पादन वाढ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

जागतिक बँक अर्थसहाय्यित, राष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत माहिती आणि दळणवळणाच्या साधनांद्वारे हवामानावर आधारित कृषीसल्ला सेवा या विषयावर तीन आठवड्यांचा ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व प्रोसोईल प्रकल्प, जीआयझेड, नवी दिल्लीतर्फे नुकताच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कुलगुरू डॉ.पाटील बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विनोद कुमार सिंग उपस्थित होते. यावेळी डॉ. अशोक फरांदे, डॉ. शरद गडाख, राजीव अहल हे उपस्थित होते.

डॉ. विनोद कुमार सिंग यांनी बोलताना हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रावर होणार्‍या परिणामांचा उल्लेख केला व केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद अंतर्गत करण्यात आलेल्या विविध संशोधनाची माहिती दिली. अभ्यासक्रमाचे संयोजक डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. इंद्रनील घोष, डॉ. मुकुंद शिंदे, रणजीत जाधव, डॉ. रवी आंधळे, डॉ. जयवंत जाधव यांनी काम पहिले. अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. वैभव मालुंजकर, डॉ. स्नेहल कानडे, व मोहसीन तांबोळी यांनी काम केले. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी देशभरातून एकूण 107 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते व त्यांना कृषी हवामानशास्त्र विषयातील देशभरातील 35 तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com