म. फुले कृषी विद्यापीठातील रोजंदारी कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीबाबत उच्च न्यायालयात याचिका

म. फुले कृषी विद्यापीठातील रोजंदारी कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीबाबत उच्च न्यायालयात याचिका
राहुरी कृषी विद्यापीठ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील रोजंदारी कामगारांची चार कोटी 17 लाख 28 हजार इतकी रक्कम विद्यापीठ व ठेकेदार यांनी कपात करूनही प्रत्येक कामगारांच्या बँक खाती वर्ग केली नाही, म्हणून नाशिक येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे आयुक्त व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्यासमोर याचिका दाखल केली आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनचे सरचिटणीस कॉ. बाळासाहेब सुरुडे यांनी दिली.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी कामगारांना नोकरीतून कपात करण्यात आले होते. कपातीनंतर कामगारांनी पुन्हा कंत्राटी पध्दतीने विद्यापीठाकडे काम केले. त्यावेळीही त्यांना किमान वेतन दिले जात नव्हते व भविष्य निर्वाह निधीही कपात केला जात नव्हता. यासाठी संघटनेने आंदोलने व कायदेशीर मार्ग अवलंबिला. त्यानंतर कृषी विद्यापीठाने कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात सुरुवात केली.

विद्यापीठाकडील कंत्राटी कामगारांची सन 2008 पासून पुढे भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करण्यास सुरुवात केली. सदरची रक्कम प्रत्येक कामगारांच्या खात्यावर जमा करणेसाठी भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडून त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम जमा करणे आवश्यक असताना विद्यापीठाने भविष्य निर्वाह निधी खाते एमएचएनएसके क्र. 5453 या विद्यापीठाच्याच खात्यावर सन 2008 ते डिसेंबर 2013 याकालावधी अखेर 4 कोटी 17 लाख 28 हजार रुपये कपात करून भरण्यात आले.

ज्या कामगारांची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कपात केली त्यांना स्वतंत्र खाते देऊन त्या कामगारांचे खाती ती रक्कम जमा करणे आवश्यक आहे. याबाबत संघटनेने नाशिक येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली, मोर्चे काढले, आंदोलने केली. परंतु त्याची दखल घेतली नाही, त्यातील बरेच कामगार सेवानिवृत्त झाले असून काही कामगार मयत झाले आहेत. यामुळे त्यांना पेन्शन पासून वंचित राहावे लागले आहे. त्यांना कपात झालेली रक्कम काढता येत नाही, कामगारांना न्याय मिळावा म्हणून युनियनच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने प्राथमिक सुनावणी घेवून प्रतिवादी यांना नोटिसा काढल्या आहेत. याबाबत न्यायालयात 23 डिसेंबर 2021 रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली असल्याचे कॉ. बाळासाहेब सुरुडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com