
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
जो दुसर्याला आनंद देतो तो नंद! दुसर्याला आनंद जेथे तेथे भगवंत येतात, संसारात इतरांना आनंद द्या, त्यातुन भगवंतभक्तीचा आनंद मिळेल, असे प्रतिपादन गोदावरी धाम चे प्रमुख महंत रामगिरीजी महाराज यांनी केले.
तालुक्यातील पिंपळस येथे ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता महंत रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. त्याप्रसंगी महंत रामगिरी महाराजांनी विश्वाचा जनिता। म्हणे यशोदेसि माता॥ ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत संत तुकाराम महाराजांच्या गवळणीवर महाराजांनी काल्याचे किर्तन केले. भाजपाचे जेष्ठ कार्यकर्त्ये तथा माजी जिप सदस्य नितीनराव कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग 22 वर्षापासुन अखंड हरिनाम सप्ताहाचे उत्कृष्ठ नियोजन होते. त्यांचे महाराजांनी कौतुक केले.
याप्रसंगी उद्योजक तथा गेल्या 22 वर्षापासुन काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसाद देणारे विजयराव गेणूजी सदाफळ, दहेगावचे माजी सरपंच भगवानराव डांगे, राहात्याचे सामाजिक कार्यकर्त्ये डॉ. स्वाधिन गाडेकर, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्हाडे, गोदावरी धाम चे ट्रस्टी मधुकर महाराज, गणेश महाराज शास्त्री, रामभाउ महाराज नादीकर, वैभव रत्नपारखी, निवृत्ती डांगे, पी. डी. गमे, दत्तात्रय गुंजाळ, शंकरराव लावरे, जेष्ठ पत्रकार रामकृष्ण लोंढे, आदमाने महाराज, यांचेसह पिंपळस पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या किर्तनात महाराजांनी श्रीकृष्णाचे गोकुळातील वर्णन केले. पुतना प्रसंग, चौर्य लिला, अदि प्रसंगाचे वर्णन करत महाराजांनी भाविकांनी उपदेशही केला. आईचा महिमा त्यांनी वर्णन केला. आई म्हणजे विशाल प्रेम, ज्या भगवंताने विश्व निर्माण केले तो यशोदा मातेला आई म्हणुन हाक मारतो. अखंड ब्रम्हंडाला तृप्त करणारा भगवंत यशोदेच्या दूधाने तृप्त होतो. दु:ख रुपी विष पचविल्याशिवाय सुख रुपी लोणी मिळत नाही. भक्तांची इच्छा पुर्ण करण्यासाठी भगवंत येतात, भगवंताकडे 9 लाख गायी होत्या, त्यामुळे त्यांनी लोणी चोरेल कसे? त्या चौर्य लिला होत्या. नको त्या ठिकाणी नाचण्यापेक्षा भजनात नाचा असेही महंत रामगिरी महाराज म्हणाले.
सदगुरु योगिराज अखंड हरिनाम सप्ताहाची मागणी काल पिंपळसकरांनी पुन्हा केली. आम्हाला सप्ताह द्या, आम्ही पंचक्रोशीच्या सहकार्याने चांगला करु, अशी मागणी पिंपळस सोसायटीचे माजी अध्यक्ष बंडोपंत खापटे यांनी पिंपळस पंचक्रोशीच्या वतीने महंत रामगिरी महाराजांकडे केली. या मागणीस टाळ्या वाजवुन भाविकांनी प्रतिसाद दिला.