संगमनेरमध्ये महादूध एल्गार आंदोलन

मुख्यमंत्र्यांना पाठविली पत्रे
संगमनेरमध्ये महादूध एल्गार आंदोलन

संगमनेर l प्रतिनिधी l Sangamner

दूध उत्‍पादकांच्‍या मागण्‍या राज्‍यातील महाविकास आ‍घाडी सरकारने तातडीने मान्‍य कराव्‍यात या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष महायुतीच्‍या वतीने तालुक्‍यातील विविध गावांमधुन मुख्‍यमंत्र्यांना पत्र पाठवून महादूध आंदोलनाचा एल्‍गार करण्‍यात आला.

दूधाला प्रति लिटर ३० रुपये भाव द्यावा, दूध उत्‍पादकांच्‍या खात्‍यात प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान तातडीने जमा करावे, दूध भुकटीला प्रति किलो ५० रुपये दर द्यावा अशा मागण्‍या महाविकास आघाडी सरकारकडे करण्‍यात आल्‍या आहेत. मात्र या मागण्‍यांबाबत राज्‍य सरकारने अद्याप कोणतेही गांभिर्य घेतलेले नाही. सरकारच्‍या या कृतीचा निषेध म्‍हणून भाजपा महायुतीच्‍या वतीने संपूर्ण राज्‍यातून मुख्‍यमंत्र्यांच्‍या मातोश्री निवासस्‍थान ५ लाख पत्र पाठविण्‍याचे महादूध एल्‍गार आंदोलन सुरु करण्‍यात आले आहे.

संगमनेर तालुक्‍यातील दूध उत्‍पादक शेतक-यांनी भाजप महायुतीच्‍या नेतृत्‍वाखाली पोस्‍ट कार्यालयात जावून मुख्‍यमंत्र्यांना या मागण्‍यांचे पत्र पाठविले. पोस्‍ट कार्यालय हे मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारतीत असल्‍याने पत्र टाकण्‍यास गेलेल्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्‍यांना गेटवरच अडविण्‍याचा प्रयत्‍न झाला. मात्र आंदोलनकर्त्‍यांनी आम्‍ही स्‍वत:च जावून पत्र टाकणार अशी भूमिका घेतल्‍याने प्रशासनासही नमते द्यावे लागले. १०० हून आधिक कार्यकर्ते आणि दूध उत्‍पादकांनी थेट प्रवेश व्‍दारातून प्रवेश मिळवून मुख्‍यमंत्र्यांच्‍या मातोश्री निवासस्‍थानी आपल्‍या मागण्‍यांचे पत्र पाठविले.

याप्रसंगी भाजपाचे तालुका डॉ.अशोक इथापे, शेतकरी संघटनेचे संतोष रोहोम, जनसेवा मंडळाचे तालुका अध्‍यक्ष अॅड.भास्‍करराव दिघे, राजेश चौधरी, बाजार समितीचे माजी उपसभापती सतिष कानवडे, वैभव लांडगे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्‍यातही विविध गावांमध्‍ये भाजपा महायुतीच्‍या वतीने मुख्‍यमंत्र्यांना दूध उत्‍पादकांनी मोठ्या संख्‍येने पत्र पाठविले आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com