माजी मंत्री पिचड यांचे 'या' मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

माजी मंत्री पिचड यांचे 'या' मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील कोविड रुग्णांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या अत्यंत भयावह असून रुग्णांना उपचार मिळत नाही, ऑक्सीजन चा तुडवडा, इंजेक्शन साठी रुग्णांच्या नातेवाईक वणवण फिरत आहे.रुग्णांकडे उपचारासाठी पैसे नाही, जमिनी, घरदार विकुन सावकाराकडून कर्ज घेऊन उपचारासाठी पैसे असुनही बेड मिळत नाही, या पार्श्वभूमीवर शासनाने अकोले तालुक्या सारख्या आदिवासी भागासाठी विशेष उपाय योजना करावी अशी मागणी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे.

पिचड यानी मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, करोना या जागतिक महामारीने संपूर्ण जगाला हैराण केलेले आहे. आपल्या देशासह राज्यात करोनाची दुसरी लाट आली असून यामुळे अकोले तालुक्यात अत्यंत भयावह गंभीर परिस्थिती उदभवली असून गरीबांचे, रुग्णांचे होणारे हाल आपल्याला पहावत नाही. या अनुषंगाने काही उपाय योजना करणे गरजेचे आहे. याबाबत आपणास प्रत्यक्ष भेटून अवगत करणे गरजेचे होते. मात्र माझ्या प्रकृती अस्वस्थामुळे मी आपणास भेटू शकत नाही. त्यामुळे या पत्राद्वारे तालुक्यातील परिस्थितीबाबत अवगत करीत आहे. त्यानुसार निश्चित कार्यवाही व्हावी अशी विनंती केली आहे.

अकोले तालुक्यात ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावे, अकोले ग्रामीण रुग्णालयासह कोतूळ, राजूर, समशेरपूर येथील रुग्णालयात प्रत्येकी 50 ऑक्सिजन बेड तसेच प्रत्येकी 10 व्हेंटीलेटर तज्ञ आरोग्य अधिकार्‍यांसह मिळावे, तालुक्याला रेमडिसीवीर इंजेक्शनचा स्वतंत्र कोठा मुबलक प्रमाणात मिळावा, लसीकरणाचा वेग वाढवावा या अनुषंगाने तालुक्यातील चार ग्रामीण रुग्णालयास व 10 प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच 80 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये उपलब्ध व्हाव्यात, ज्या प्रमाणे आदिवासी उपयोजनेतून रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बंद पडलेल्या रुग्णवाहिका पून्हा सुरु करण्यात याव्यात व त्यासाठीची आर्थिक तरतूद करावी, तालुक्यातील आरोग्य यंत्रणेतील अनेक वैद्यकीय अधिकारी यांच्या जागा एम.बी.बी.एस., एम.डी, एम.एस. या रिक्त असून पेसा अंतर्गत या रिक्त असलेल्या जागा त्या-त्या विभागात भरण्यात याव्यात, आदिवासी भागातील मुख्य केंद्र समजल्या जाणार्‍या राजूर येथे मिनी सिव्हील हॉस्पिटलची उभारणी तातडीने करण्यात यावी. अकोले प्रमाणे, राजूर, समशेरपूर, कोतूळ भंडारदरा, गणोरे या तालुक्यातील मोठ्या गावांत शिवभोजन थाळी सुरु करण्यात यावी, करोना काळातील ग्रामपंचायती व नगरपालिकाचे पिण्याच्या पाण्याचे वीज बिल माफ करावे. तसेच घरगुती वीज बिल, छोटे दुकानदारांचे व शेतकरी यांचे वीज बिल माफ करावे व करोना काळात कोणाचीही वीज कनेक्शन तोडू नये, अकोले तालुक्यातील कोव्हीड अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहे. त्याबाबत आपण योग्य ती कार्यवाही कराल ही अपेक्षा ठेवून तालुक्यातील इतर विकासाच्या प्रश्नासंदर्भात मी आपणास त्रास देणार नाही,

अकोले तालुक्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, मागासवर्गीय, आदिवासी, भटके तसेच सर्वच घटकातील लोक कोरोनामुळे अत्यंत भितीच्या सावटाखाली असून रुग्णांच्या उपचारासाठी जमिनी, घरे विकून सावकाराकडून कर्ज घेवून माणसे वाचविण्यासाठी वणवण फिरत आहे, अनेकांनी जग सोडले आहे. त्यामुळे अनेक कुंटुंब, घरे उदवस्त झाली असून त्यांना आधार देण्यासाठी मायबाप सरकारने मदतीचा एक हात पुढे करावा असे साकडे पिचड यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. राज्यपाल, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनाही पिचड याांनी हे पत्र पाठविले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com