आजपासून मढी यात्रोत्सवास प्रारंभ

कैकाडी समाज मानाच्या काठीची कळस भेट
आजपासून मढी यात्रोत्सवास प्रारंभ

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

राज्यासह देशभर प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानीफनाथांच्या यात्रेस आज सोमवार (दि.6) पासून प्रारंभ होत आहे. 15 दिवस चालणार्‍या यात्रेसाठी विविध राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक मढी येथे येतात. सकाळी 9 वा.कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला भेटवून तर सायंकाळी गोपाळ समाजाची होळी पेटवल्या नंतर मढी यात्रेस प्रारंभ होणार आहे. गोपाळ समाजाचा दोन गटाचा वाद लक्षात घेता होळी पेटवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

मढी यात्रा 6 मार्च रोजी प्रारंभ होऊन रविवार 12 रोजी रंगपंचमी यात्रेचा मुख्य दिवस आहे. होळी ते गुढीपाडव्यापर्यंत मढीची यात्रा भरते. यात्रेसाठी येणार्‍या भाविकांची संख्या ही लक्षणीय असण्याची शक्यता असून परिणामी भाविकांची सोय व्हावी यासाठी प्रशासनाकडून ठोस नियोजन करणे अपेक्षित आहे.पोलीस प्रशासन वगळता इतर विभागाकडून यात्रेची कुठलीही दखल आतापर्यंत घेण्यात आलेली नाही.

पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी बैठक झाल्यानंतर वेळोवेळी पाहणी करून पोलीस विभागाकडून वाहनतळ रस्ते व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत आहे. यात्रेनिमित्त पुणे, नगर , पाथर्डी, करंजी, तिसगाव, शेवगाव, सोलापूर, पंढरपूर, औरंगाबाद येथून विविध हॉटेल व्यावसायीक दाखल झाले आहेत. रहाट, पाळणे, मनोरंजनाची साधने, प्रसाद, खेळणीची दुकाने थाटण्यासही सुरुवात झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आदींनी येथे श्रध्दा व्यक्त करत संपूर्ण गडाचा विकास केला. राजघराण्याने विकास केला म्हणून आजही संपूर्ण गड एखाद्या किल्ला सारखा दिसतो. गड बांधणीसाठी विविध जाती धर्माच्या भावीकांचे योगदान लाभल्याने छत्रपतींना अशा सर्व भटक्या समाजाला यात्रेत विविध रूपात मानपान दिले. मढी यात्रेसाठी गुजरात, आंध्रप्रदेश, तमीळनाडू यासह विविध राज्यांतून मोठ्या संख्येने भावीक येथे येतात. 15 दिवस चालणार्‍या यात्रेची सर्व तयारी देवस्थान समिती व ग्रामपंचायतीकडून सुरू आहे.

भक्तांना सुलभपणे दर्शन घेता यावे यासाठी दर्शन बारीत बॅरीकेटींग व मजबूत रेलिंग अशी कामे युध्द पातळीवर सुरू आहेत. मुख्य कानीफनाथ मंदीर व परीसरात सुशोभिकरण, दर्शन बारी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, वाहनतळ,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठीच्या कामाने वेग घेतला असून मंदिर व मंदिर परिसर व आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर असणार आहे.

मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, सचिव विमल मरकड, ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच संजय मरकड, उपसरपंच रवींद्र अरोळे, ग्रामसेवक विठ्ठल राजळे, ग्रामपंचायत सदस्य देवस्थान समिती सर्व विश्वस्त, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सर्वच कर्मचारी व विश्वस्त परीश्रम घेत आहेत. देवस्थान समितीने 18 ते 21 मार्च दरम्यान गुढी पाडव्यापूर्वी चार दिवस अगोदर कानिफनाथांचे समाधीमंदिर दर्शनाला खुले ठेऊन समाधी मंदिरात भाविकांना थेट प्रवेश मिळणार आहे.

खड्ड्यांचा भाविकांना त्रास

नियोजन बैठकीत ठरल्याप्रमाणे संबंधित विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत . जे खड्डे बुजवले ते चक्क मातीने बुजवल्याने माती टाकलेले खड्डे पुन्हा उघडे पडत असल्याने तत्काळ हे काम थांबवून डांबर-खडीने पॅचवर्कचे काम करावे, अशी मागणी होत आहे. तिसगाव व निवडूंगे ते मढी या रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने यात्रा काळात भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com