..तर मढी कानिफनाथ मंदिर होणार बंद

विश्वत मंडळावर कारवाईचा प्रांतधिकार्‍यांचा इशारा
..तर मढी कानिफनाथ मंदिर होणार बंद

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

मंदिर उघडण्याबाबत शासनाच्या आदेशाचे पालन करताना मढी व वृध्देश्वर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाने सर्व नियमांचे पालन न केल्यास विश्वस्त मंडळाविरुध्द कारवाई करण्यात येईल व आगामी काळात मढी येथे दहा पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास मढी गावासह कानिफनाथ मंदिर बंद करण्यात येईल.असा इशारा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी दिला.

श्रीक्षेत्र मढी येथे मंदिरे उघडण्याच्या पार्श्वभूमीव मढी देवस्थान व वृद्धेश्वर देवस्थान समिती मंडळ, मढी ग्रामपंचायत प्रतिनीधी व तालुका प्रशासनाच्या संयुत्त बैठकीत ते मढी येथे बोलत होते. यावेळी तहसीलदार श्याम वाडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, भगवान सानप, पंचायत समिती गट विकास अधिकारी शितल खिंडे, विस्तार अधीकारी प्रशांत तोरवणे, मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष बबन मरकड, विश्वस्त शामराव मरकड, रवींद्र आरोळे, घाटशिरसचे सरपंच गणेश पालवे, विश्वस्त आबासाहेब पाठक, जनार्दन पालवे ज्ञानेश्वर पाठक, मढी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अशोक पवार, तलाठी पल्लवी बर्‍हाटे, ग्रामसेवक विठ्ठल राजळे आदी विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. मढी येथे चैतन्य कानिफनाथाची संजीवन समाधी असून शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मोहटादेवी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी मढी मायंबा वृद्धेश्वर या ठिकाणी येते.

असा दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने मढी व वृद्धेश्वर देवस्थान समिती मंडळाची बैठक घेऊन शासकीय नियमांची कल्पना देत विविध मार्गदर्शक सूचना केल्या.

यांना आहे बंदी

मंदिरामध्ये हार पुजेचे कोणतेही साहित्य किंवा इतर कोणतेही सामान घेऊन जाण्यास सक्त मनाई राहील. दहा वर्षांखालील तसेच 65 वर्षावरील व्यक्ती, गर्भवती महिला,आजारी व्यक्ती,रेड झोन,कन्टेन्मेंट झोन मधील व होम क्वारंटाईन असलेल्या भक्तांना दर्शनाकरिता मंदिरात बंदी राहील. मंदिर परिसरातील व्यावसायिकांना करोना चाचणी बंधनकारक असून ज्यांनी लशीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच दुकान उघडता येईल. अन्यथा 14 दिवस दुकान सील करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.