मढी येथे मानाची होळी पेटताच दोन गटात हाणामार्‍या

पोलिसांकडून बळाचा वापर
मढी येथे मानाची होळी पेटताच दोन गटात हाणामार्‍या

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

भटक्याची पंढरी समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र मढी येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेली गोपाळ समाजाची मानाच्या होळी पेटल्यानंतर एका गटाने दुसर्‍या गटावर अचानक हल्ला केल्याने एकच धावपळ व गोंधळ उडाला. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत मध्यस्थी केल्यानंतर वाद निवळला.

दुपारी गोपाळ बांधवांनी समाजाची बैठक घेऊन विविध समस्यांची चर्चा केली. चर्चा सुरू असताना गोपाळ समाज बांधवांमध्ये शाब्दिक चकमक होऊन वाद झाले. वादामुळे बैठक अर्धवट मोडण्यात आली. त्यानंतर मानकर्‍यांंचा पारंपरिक मार्ग ऐनवेळी बदलल्याने पोलीस यंत्रणांची धावपळ उडाली. पोलिसांनी वेळीच सतर्क होत मानकर्‍यांना गडाच्या पायथ्याशी रोखले. त्यानंतर पाच मानकर्‍यांना पोलीस बंदोबस्तात पारंपरिक मार्गाने कानिफनाथ गडावर नेण्यात आले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी कडक भूमिका घेत जे मानकरी हजर असतील त्यांनाच गोवर्‍या दिल्या जातील, अशी आक्रमक भूमिका घेतली. नाथाच्या समाधीचे दर्शन घेऊन देवस्थान समितीच्या वतीने मानकर्‍यांना गोवर्‍या देण्यात आल्या. मानाच्या गोवर्‍या घेत त्या डोक्यावर ठेऊन कानिफनाथांच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर गडाच्या पायथ्याला साखर बारवेजवळ पोलीस बंदोबस्तात नामदेव माळी, माणिक लोणारे, हरिभाऊ हंबीराव, रघुनाथ काळापहाड, पुंडलिक नवघरे, सुंदर गिर्हे या गोपाळ सामाजाच्या पाच मानकर्‍यांनी होळी पेटवली. याचवेळी एका गटाने हल्ला केल्याने दोन्ही गटांत हाणामार्‍या झाल्या. यामुळे उपस्थितांची धावपळ उडाली. परंतु पोलिसांनी वेळीच बळाचा वापर करत दोन्ही गटांना रोखल्याने अनर्थ टळला.

होळी पेटवताना 3 पोलीस निरीक्षक यांच्यासह 125 कर्मचारी, पोलीस दंगल नियंत्रण पथक, होमगार्ड असा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. या वेळी प्रांतअधिकारी प्रसाद मते, तहसीलदार श्याम वाडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, भगवान सानप, मढी देवस्थान समीतीचे अध्यक्ष बबन मरकड, सरपंच संजय मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, देवस्थानचे कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त अर्जुन शिरसाठ, शामराव मरकड, डॉ . विलास मढीकर, मार्केट कमिटीचे माजी संचालक नवनाथ मरकड, ग्रामसेवक विठ्ठल राजळे आदी उपस्थित होते .

अद्यापही वाद

चैतन्य कानिफनाथ मंदिर बांधण्याला गोपाळ समाजाने खूप मोठी मदत केल्याने गावची सार्वजनीक होळी पेटवण्याचा मान त्या समाजाला देऊन स्थानीक ग्रामस्त आज होळी करत नाहीत. 1994 साली होळी पेटविण्याच्या मान पानावरून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन अनेकजन जखमी झाले होते. यानंतर मानाची होळी बंद करण्यात आली होती. 2006 साली न्यायालयामध्ये दोन्ही गटामध्ये समेट घडुन होळी पेटवीण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अद्यापही या दोन गटात वाद घडत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com