मढेवडगाव सोसायटी मतदार याद्यांमध्ये गोंधळ

जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला केराच्या टोपल्या
मढेवडगाव सोसायटी मतदार याद्यांमध्ये गोंधळ
File Photo

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. जिल्हा उपनिबंधक, तालुका सहकार उपनिबंधक यांच्या मार्गदर्शक तत्वाला व आदेशाला हरताळ फासत सचिव व पदाधिकारी मतदार यांद्यांमध्ये गोंधळ घालत असल्याचे आरोप सभासद व संचालकांनी केले आहेत.

या निवडणुकीसाठी 31 मार्च रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर 11 एप्रिलपर्यंत हरकती मागवण्यात आल्या. कर्जदार सभासदांनी हरकती दाखल केल्या. हरकतीवरील निकाल देण्यासाठी तीन दिवस आधी हरकतदारांना नोटिसा मिळणे आवश्यक असताना राजकीय नेत्यांच्या दबावाखाली अधिकारी व सचिवांनी मिलीभगत करत निकाला दिवशीच हरकतदारांना नोटिसा देण्याचा अजब कारभार केला आहे. याशिवाय जिल्हा बँकेने पशु खाद्य कर्जाला 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली.

या मुदत वाढीचे बँक व संचालकांनी मोठ्या जाहिराती करून श्रेय घेतले. पशु खाद्य कर्जाच्या 43 सभासदांना 31 मार्च रोजी संस्थेने थकबाकीदार ठरवून त्यांना मतदानाचा हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी सचिव व पदाधिकार्‍यांनी खेळी केली. परंतु बँकेनेच करोना महामारीमूळे कर्ज भरण्यास मुदत वाढ दिल्याने हे सभासद 30 जूनपर्यंत थकबाकीदार राहत नाहीत. गावातील राजकीय अड्डा बनवलेल्या संस्थेत मनमानी कारभार व खातेदार नसतानाही फक्त 100 रुपये भरून सभासद केलेल्या 1 हजार 400 पैकी जवळपास 327 सभासदांना जीवावर निवडणूक जिंकण्याची गणिते करत प्रत्यक्ष कर्जदार सभासदांना मतदानापासून डावलण्यासाठी खटाटोप चालू आहेत असे आरोप सभासदांनी केले आहेत.

बोगस सभासदांना जिल्हा सहकारी उपनिबंधक यांनी मतदार यादीतून वगळण्याचा आदेश असूनही संस्थेने पात्र मतदार यादीसाठी बोगस सभासदांची नावे पाठवली आहेत. तर कर्जदार सभासदांना जिल्हा बँकेने मुदतवाढ दिली असूनही 43 खर्‍या खातेदार सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- अंबादास मांडे, कर्जदार सभासद शेतकरी.

Related Stories

No stories found.