माजी चेअरमन माधव लांडगे यांचे अपघाती निधन
सार्वमत

माजी चेअरमन माधव लांडगे यांचे अपघाती निधन

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

संगमनेरकडून नाशिकच्या दिशेने जाणार्‍या कारने संगमनेरच्या दिशेने येणार्‍या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन माधव लक्ष्मण लांडगे (वय 54) हे गंभीर जखमी होवून जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर हॉटेल कुणाल समोर घडली. या घटनेने शिक्षक वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.

माधव लांडगे हे आपल्या ताब्यातील मोटारसायकलहून हॉटेल कुणाल येथूून जात असताना कारने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांना तात्काळ घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषीत केले.

माधव लक्ष्मण लांडगे हे मुळचे संगमनेर तालुक्यातील वडगावलांडगा येथील रहिवाशी होते. प्राथमिक शिक्षकांचे नेते होते. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे ते चेअरमन राहिले होते. सध्या अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते सेवा बजावत होते.

काल रात्री 9.30 वाजेच्या सुमारास ते आपल्या मित्रासोबत मोटारसायकलहून जात असतांना हॉटेल कुणाल जवळ त्यांच्या मोटारसायकलला कारने जोराची धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com