
देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata
नेवासा तालुक्यातील मडकी येथील शाळेत नेहमी उशीरा येणार्या व शालेय वेळेत कायम मोबाईलमध्ये व्यस्त राहणार्या कामचुकार प्राथमिक शिक्षकाची बदली होवून कारवाई करावी या मागणीसाठी 19 सप्टेंबरपासून नेवासा पंचायत समितीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा पालक व ग्रामस्थांनी दिला आहे.
गेल्या वर्षभरापासून शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार करण्यात येवूनही कुठलीच दखल घेतली नसल्याने उपोषणास बसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मडकी येथील पहिली ते चौथी पर्यंतच्या प्राथमिक शाळेत दोघा शिक्षकांची नियुक्ती होती. मध्यंतरी औरंगाबादहून जाऊन येऊन शाळा चालविणार्या एका शिक्षकावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. परंतु हे शिक्षक शाळेत बेजबाबदारपणाने वागतात. नेहमी शाळेत उशिरा येतात. शाळेत आल्यानंतर सतत मोबाईलमध्ये व्यस्त असतात.
या शिक्षकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालक व ग्रामस्थांच्या वतीने वेळोवेळी गटशिक्षणाधिकार्यांना लेखी तक्रारी केल्या मात्र शिक्षण विभाग या बेजबाबदार शिक्षकाला पाठिशी घालत असल्याचा आरोप नागरिकांनी निवेदनात केला आहे. वर्षापासून कामचुकार शिक्षकावर लेखी तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांत संतापाची भावना आहे. आता या शिक्षकावर वरिष्ठांनी कारवाई करण्याच्या मागणीसाठी येत्या 19 सप्टेंबर रोजी मडकी ग्रामस्थांनी नेवासा पंचायत समिती समोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनावर ज्ञानेश्वर लबडे, महेंद्र बीडगर, शेखर लबडे, ज्ञानेश्वर बोडखे आदींसह अनेक पालक व ग्रामस्थांची नावे व सह्या आहेत.
वरिष्ठांनी शाळेची तपासणी करावी
एकेकाळी महाराष्ट्रात खो-खो, कबड्डीसह वैयक्तिक खेळाचा दबदबा असणार्या चांदा विद्यालयात सध्या क्रिडा शिक्षकच नसल्याची बाब या बैठकीदरम्यान पालकांना समजल्याने याबाबत नाराजी व्यक्त करत तातडीने क्रिडा शिक्षक नेमण्याच्या मागणीसह शाळेत शिस्त आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा प्रशासनानेही कठोर उपाययोजना करावी अशी मागणीही पालकांनी केली.