
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिक दांपत्याची फसवणूक करण्यात आल्याची घटना केडगाव उपनगरात मंगळवारी सकाळी घडली. अनोळखी व्यक्तीने सुमारे दोन तोळे सोन्याचे दागिने व मोबाईल लंपास केला आहे. या प्रकरणी विमल बबन कातोरे (वय 55 रा. संभाजी चौक, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांचे पती केडगाव बस स्थानकावर भाजीपाला विक्रीचा व्यावसाय करतात. त्यांच्याकडे एक रिक्षा आले. त्या रिक्षावर बक्षीस योजनेचे स्टिकर लावलेले आहे. मंगळवारी सकाळी एक अनोळखी व्यक्ती कातोरे दांपत्याकडे आला व त्यांना म्हणाला,‘तुमच्या रिक्षावर जे स्टिकर लावले आहे, त्याचे तुम्हाला 60 हजार रूपये व दोन तोळे सोने, असे बक्षीस लागले आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या अंगावरील सोने काढून देवून त्या सोन्याच्या पावत्या मी कंपनीला दाखवून तुम्हाला तुमचे बक्षीस आणून देतो, अशी बतावणी केली.
फिर्यादी यांनी त्या व्यक्तीला अंगातील दागिने काढून दिले. तो व्यक्ती दागिने घेऊन पसार झाला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर कातोरे दांपत्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.