लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार

औरंगाबादच्या व्यक्तीविरूध्द तोफखान्यात गुन्हा
लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दीड वर्षे अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवार, 27 ऑगस्टरोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद नीळकंठ शिरसाठ (वय 60 रा. संजयनगर, आकाशवाणी केंद्राजवळ, औरंगाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. येथील एका उपनगरात राहणार्‍या पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला या एकट्या राहत होत्या. त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. प्रमोद शिरसाठ याच्यासोबत त्यांची ओळख होती. तो जानेवारी 2020 मध्ये पुतण्याची लग्नपत्रिका घेऊन फिर्यादी महिलेच्या घरी सायंकाळी आला होता. त्या दिवशी पाऊस असल्यामुळे त्याने फिर्यादीच्या घरातच मुक्काम केला. घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन फिर्यादीवर बळजबरीने अत्याचार केला. शेजारील लोकांना माहिती झाल्यास या घटनेचा बोभाटा होईल म्हणून या महिलेने याकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर प्रमोद शिरसाठ याने आपली पत्नी आपल्या समवेत राहत नाही, असे म्हणून लग्न करण्याचे आमिष दाखवले. संबंधित महिलेला घेऊन पुणे जिल्ह्यातील एका धार्मिक स्थळी गेला. तेथे दर्शन घेऊन आपले पती-पत्नीचे नाते झाले, असे म्हणाला. त्यानंतर शिरूर बसस्थानकाजवळील साई सवेरा हॉटेलच्या लॉजमध्ये वेळोवेळी अत्याचार केला. महिलेने प्रमोद शिरसाठ यांना वेळोवेळी लग्नाचा विषय काढला असता, त्याने लग्न करण्याचे टाळाटाळ करून फसवणूक केली. या महिलेने दिलेले फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com