लम्पीला रोखण्यासाठी गावोगावी स्वच्छ गोठा मिशन

7 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत मोहीम

संगहीत चित्र
संगहीत चित्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात वेगवान लसीकरणानंतरही वाढता लम्पी रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून गावोगाव ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ ही मोहीम 7 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे.

जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांपासून लम्पी रोगामुळे पशुसंवर्धन विभागासह शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 19 हजार 434 जनावरे या रोगाने बाधित झाली आहेत. त्यातील 1 हजार 224 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मागील महिन्यांत सलग पाऊस सुरू असल्याने जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाली. दुसरीकडे 100 टक्के लसीकरण होऊनही सध्या बाधित जनावरांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या संसर्गाला नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने राज्यात पशुसंवर्धन विभागाने माझा गोठा, स्वच्छ गोठा ही मोहीम सुरू केली आहे.

जनतेच्या सहभागातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील बाधीत शहरे, गावे, वाड्यावस्त्या, पाडे व तांडे येथील पशुधनाचे सर्वेक्षण आणि लम्पी पशुपालकांना जैव सुरक्षा उपाय व अनुषंगीक आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मोहीम कालावधीमध्ये बाधीत गावांमध्ये गोठा भेटी घेण्यासाठी सर्वेक्षण पथके तयार केली जाणार असून एका पथकामध्ये 1 पशुवैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, स्थानिक ग्रामपंचायतीकडील 2 स्वयंसेवक असतील. हे पथक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावांना मोहीम कालावधी दरम्यान भेट देईल.

गोठाभेटीव्दारे लंपीसदृष्य लक्षणे असणार्‍या गोधनास जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेमध्ये तात्काळ संदर्भीत करण्यात येईल व तेथे आवश्यक उपचार होतील. मोहिमेदरम्यान पशुपालकांना प्रशिक्षणाच्या वेळी लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव संदर्भात घ्यावयाची काळजी व सूचना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. पशुधनाच्या उपचारासाठी औषधांचा साठा सर्व चिकित्सालय, तालुका लघू पशुवैद्यकीय चिकित्सालय, पशुवैद्यकीय दवाखाना येथे उपलब्ध असेल. बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठाने प्रसारीत केलेल्या सुधारीत मार्गदर्शक तत्वानुसार गोठ्यांची स्वच्छता, परिसर स्वच्छता, पशुधनाच्या शरीरावरील किटकांचे व्यवस्थापन आदी अंमलबजावणी करण्यात येईल.

लसमात्रा, औषधी, किटकनाशके व इतर साधनसामग्री जिल्हा स्तरावरून उपलब्ध करुन देण्यात येणार असून यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळणार आहे. लोकप्रतिनिधी, ग्रामविकास, महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी, खासगी पशुचिकीत्सक व सेवादाता यांचा या मोहीमेसाठी सहभाग घेण्यात येणार आहे. मोहिमे अंतर्गत प्रोत्साहन म्हणून नमुद निकषांवर आधारीत जिल्हानिहाय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com