लम्पीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा

ना. काळेंच्या पशुसंवर्धन विभागाला सूचना
लम्पीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यात अनेक जनावरांना लम्पी स्किन सदृश आजाराची लागण झाली आहे. या रोगाचा प्रादूर्भाव जनावरांच्या आरोग्यासाठी हानिकारक असून काही जनावरे या आजारामुळे मृत्यूमुखी पडली आहेत. याची गांभिर्याने दखल घेऊन पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा, अशा सूचना ना. आशुतोष काळे यांनी पशुसंवर्धन विभागाला दिल्या आहेत.

मागील काही दिवसांत तालुक्यातील काही गावांमध्ये जनावरांना लम्पी स्किनसदृश रोगाचा प्रादूर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर ना. आशुतोष काळे यांनी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन परिस्थिती जाणून घेत उपाययोजनांबाबत चर्चा केली.

ना.आशुतोष काळे म्हणाले, तालुक्यातील काकडी गावातील काही जनावरांमध्ये लम्पी रोगाचे विषाणू आढळून आले आहेत. लम्पी स्किन आजारामुळे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होऊन जनावरांना अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे ज्या जनावरांमध्ये लम्पी स्किनसदृश आजाराचे लक्षण दिसत आहेत, अशा जनावरांचे व त्या गावातील व परिसरातील सर्वच जनावरांचे लसीकरण करण्यावर भर द्यावा. जेणेकरून जनावरांमध्ये या आजाराची व्याप्ती वाढणार नाही व या आजारावर लवकर नियंत्रण मिळविणे शक्य होईल.

लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व पशुधन वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभाागाने शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी. शेतकर्‍यांनी देखील पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून ज्या जनावरांमध्ये लम्पी स्किनसदृश्य रोगाचे लक्षण दिसत असल्यास त्या जनावरांचा इतर जनावरांशी संपर्क येऊ न देता योग्य काळजी घेऊन जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन ना. काळे यांनी केले. यावेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अजयनाथ थोरे, पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रद्धा काटे, डॉ. दिलीप जामदार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com