साखर कारखान्यांसमोर लम्पीचे आव्हान!

लसीकरणासह कारखान्यांना व्हेटनरी डॉक्टर नेमण्याच्या साखर सहसंचालकांच्या सुचना
साखर कारखान्यांसमोर लम्पीचे आव्हान!

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जवळ आलेला असतांना जनावरांच्या लम्पी रोगाचा विळखाही घट्ट होत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संकटात सापडला आहे.

या परिस्थितीत कारखान्यांनी त्यांच्या पातळीवर पशुवैद्यक नेमावेत, कारखाना ठिकाणी येणार्‍या जनावरांचे लसीकरण करावे, लसीकरणाचे प्रमाणपत्र द्यावे, जनावरे जेथे राहणार आहेत, तेथे जंतूनाशक फवारणी करावी. तसेच पुरेसा औषधसाठा स्व खर्चाने उपलब्ध करून द्यावा, असे सुचना प्रदेशिक सहसंचालक साखर यांनी दिले आहेत.

गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी कारखान्यांनी तयारी सुरू केली आहे. गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. दुसरीकडे लम्पी स्किन रोगाचा धोकाही वाढत चालला आहे. दुसर्‍या जिल्ह्यातून जनावरे जिल्ह्यात दाखल होणार आहेत. तसेच जिल्ह्यातूनही हजारो जनावरे दुसर्‍या जिल्ह्यात जाणार आहेत. त्यामुळे आजार फैलावण्याचा धोका आहे. हा आजार जास्त वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना कारखान्यांना देण्यात आल्या आहेत. कारखान्यांनी पशुवैद्यकांची तत्काळ नियुक्ती करावी.

दुसर्‍या जिल्ह्यातून येणार्‍या जनावरांचे लसीकरण प्रमाणपत्राची खात्री केल्याशिवाय त्यांना काम देऊ नये. लसीकरणानंतर 28 दिवसांनंतरच जनावरांची वाहतूक करावी. बाहेरच्या जिल्ह्यातून किती जनावरे कारखाना परिसरात येणार आहेत याची माहिती पशुसंवर्धन विभागाला द्यावी, अशा सूचना या बैठकीत कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आल्या. दरम्यान, जिल्ह्यात आजार वेगाने फैलावत चालला असून बाधित जनावरांची संख्या सात हजारांच्या पुढे गेली आहे. पशुसंवर्धन विभागाने आजारी जनावरांवर उपचार केल्याने यातील शुक्रवार (दि. 28) अखेर 8 हजार 500 जनावरे बरी झाली आहेत. तर 886 जनावरांचा मृत्यू झाला आहे. लसीकरण मोहीमही वेगात सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

कारखान्यांसमोर नवे काम

दरम्यान, याआधी कारखान्यांसमोर लम्पीचे संकट नव्हते. मागील हंगामात अतिरिक्त उसाचे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे हंगाम लांबला होता. यंदाही जास्त उसाचे आव्हान आहेच. त्याचबरोबर आता लम्पी रोगाचेही संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना ऊस गाळपाबरोबरच लम्पी रोखण्याचेही आव्हान पेलावे लागणार आहे.

लवकरच गाळप हंगाम सुरू होणार आहे. लम्पी रोेगाच्या पार्श्‍वभूमीवर साखर कारखान्यांना पशूवैद्यक नेमण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. याच सोबत बाहेरच्या जिल्ह्यातून येणार्‍या जनावरांचे लसीकरण आवश्यक करण्यात आले आहे. यामुळे लम्पी रोगाचा फैलाव रोखता येणार आहेत.

मिलींदकुमार भालेराव (प्रादेशिक सहसंचालक साखर, अहमदनगर)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com