लम्पीची व्याप्ती वाढली, बाधितांची संख्या आता 66

22 हजार 416 गोवंशी व म्हशीचे लसीकरण पूर्ण
लम्पीची व्याप्ती वाढली, बाधितांची संख्या आता 66

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सुरूवातीला दोनच तालुक्यात असणार्‍या जनावरांच्या लम्पी स्किन आजाराची व्याप्ती जिल्ह्यात वाढतांना दिसत आहे. यामुळे जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभाग आणि राज्य सरकार पशूसंवर्धन विभागाची डोकदुखी वाढली आहे. सध्या आठ तालुक्यात लम्पीचे रुग्ण असून त्यांची संख्या आता 66 वर पोहचली आहे. यामुळे पशूसंवर्धन विभागाला आता 57 हजार 758 जनावरांचे लसीकरण करावे लागणार असून यापैकी 22 हजार 416 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

लम्पी त्वचा रोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील कॅप्रील्पॉक्स या प्रवर्गात मोडतात. मागील वर्षीही जिल्ह्यात या रोगाने प्रवेश केला होता. 15 दिवसांपासून अकोले, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, कर्जत, संगमनेर, पारनेर आणि श्रीगोंदा अशा आठ तालुक्यांत लम्पीची लक्षणे संकरीत गायांमध्ये आढळली. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने तपासणी करून नमुने पाठवली असून 66 जनावरे बाधित असल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक 19 जनावरे राहुरी, 15 अकोले, संगमनेर तालुक्यात 10, श्रीरामपूर तालुक्यात 6, नेवासा 4, कर्जत 4, पारनेर 5 आणि श्रीगोंदा 2 यांचा समावेश आहे.

पशुसंवर्धन विभागाने तातडीने बाधित आढळलेल्या ठिकाणापासून 5 किलोमीटर परिघात जनावरांचे लसीकरण सुरू केले आहे. या परिसरात गायी व म्हशी मिळून 57 हजार 758 जनावरे असून त्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. मंगळवारपर्यंत 22 हजार 416 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले होते. उर्वरित लसीकरण लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. पशूसंवर्धन विभागाने ज्या भागात लम्पी बाधित जनावरे आढळली आहेत, तेथील जनावरांची वाहतूक बंद केली आहे. तसेच त्यात्या परिसरातील जनावरांचे आठवडे बाजार बंद करण्यात येणार आहेत. दरम्यान, मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांनी लम्पीला गांर्भियाने घेतले असून ते दोघे बाधित भागात जावून पाहणी करत पशूसंवर्धनच्या अधिकार्‍यांना सुचना करत आहेत.

49 गावात लम्पी

जिल्ह्यात आतापर्यंत 49 गावात लम्पी स्किनचा शिरकाव झालेला असून यात अकोले तालुक्यातील 3, श्रीरामपूर तालुक्यातील 8, नेवासा 4, राहुरी 9, कर्जत 4, संगमनेर 5, पारनेर 12 आणि श्रीगोंदा तालुक्यातील 4 गावांचा समावेश आहे. या गावांच्या पाच किलो परिघाच्या भागात गोवंशी जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com