आठवडेभरात जिल्ह्यातील जनावरांचे प्रमुख बाजार होणार बंद

लम्पीचा संसर्ग वाढता || महिन्याला 70 ते 80 लाखांची उलाढाल होणार ठप्प
आठवडेभरात जिल्ह्यातील जनावरांचे प्रमुख बाजार होणार बंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी या चर्म रोगाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. पशूसंवर्धन विभाग लम्पी रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतांना माशा आणि डांसाचा प्रार्दुभाव वाढल्याने जनावरांमध्ये लम्पी संसर्गाचा आलेख वाढत आहे. लम्पीचा संसर्ग झालेल्या गावाच्या आणि भागाच्या दहा किलो मीटर परिसारातील जनावरांच्या वाहतुकीस जनावरांच्या आठवडे बाजार भरवण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यात भरणारे प्रमुख जनावरांचे बाजार येत्या आठ दिवसांत बंद करण्यात येणार येणार असल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाच्या सुत्रांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यातील जनावरांचे आठवडे बाजार बंद होणार असल्यामुळे जिल्ह्यातील पशूधनाच्या खरेदी विक्रीची सुमारे 70 ते 80 लाखांची मासिक उलाढाल ठप्प होणार असून याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका पशूधन उत्पादक शेतकरी, ग्राहक आणि व्यापारी यांना होणार आहे. नगर जिल्हा हा राज्यात सर्वाधिक दूध उत्पादक आणि पशूधन असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात सुमारे 15 ते साडे पंधरा लाखा लहान-मोठे पशूधन आहे. मात्र, दोन वर्षापासून लम्पी चर्मरोगाचा विळखा नगर जिल्ह्यातील पशूधनावर दिसत आहे. पशूसवंर्धन विभागाने लम्पी संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील मोठ्या जनावरांसह वासरांचे 100 टक्के लसीकरण केलेले आहे.

लसीकरण केलेल्या जनावरामध्ये लसीकरणानंतर केवळ एकवर्षेच लम्पीची रोग प्रतिकारक क्षमता राहत असल्याने रोग प्रतिकारक शक्ती संपल्यानंतर जनावरे लम्पीच्या संसर्गाला बळी पडत आहेत. यामुळे जिल्ह्यात चालूवर्षी लम्पीचा संसर्ग वाढत आहे. जिल्ह्यात 1 एप्रिलपासून 2 हजार 280 जनावरांचा लम्पीचा संसर्ग झाला असून 12 हजार 68 जनावरे लम्पीतून बरे झालेली आहेत. तर 163 जनावरांचा लम्पीने बळी घेतलेला आहे. सध्या जिल्ह्यात 849 जनावरांवर लम्पीचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 128 पशूपालकांना लम्पची भरपाई देण्यात आली असून पशूसंवर्धन विभागाने 147 पशूपालकांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निधीची मागणी नोंदवली आहे.

ही चार प्रमुख बाजार होणार बंद

नगर जिल्ह्यातील लोणी (राहाता), काष्टी (श्रीगोंदा), वाळकी (नगर) आणि घोडेगाव (नेवासा) या ठिकाणी असणारी जिल्ह्यातील पशूधनाचे आठवडे बाजार लम्पी संसर्ग वाढत असल्याने आठ दिवसांत बंद होणार आहे. या ठिकाणी दर आवड्याला हजारोच्या संख्येत जनावरांची खरेदी विक्री सुरू होती. विशेष म्हणजे या ठिकाणी राज्यासह परराज्यातील व्यापारी आणि शेतकरी जनावरे खरेदी विक्रीसाठी येत होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com