
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्ह्यात लम्पीचा प्रकोप दिवसंदिवस वाढत आहे. राज्यात लम्पी संसर्गात नगर आठव्या स्थानावर आहे. जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरांची संख्या 2 हजार 600 च्या पुढे गेली असून सक्रिय जनावरांची संख्या 940 आहे. यामुळे नगर जिल्ह्याचा समावेश हा लम्पी सर्तकता जिल्ह्यात करण्यात आला असून जिल्ह्यात लम्पी बाधित क्षेत्राच्या 20 किलो मीटरच्या परिघातून जनावरांच्या वाहतूक, बाजार आणि प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी काढले असून यात नगर जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरे यांच्यावर आहे, त्या ठिकाणी उपचार करावेत, त्यांची एका भागातून दुसर्या भागात वाहतूक करू नयेत, बाधित भागातील बाधित जनावरांची चराईसाठी आणि पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, तसेच जनावरांच्या ऑनलाईन खरेदीसह बाधित भागातून प्रत्यक्षात होणारी खरेदी विक्री थांबण्यात यावी, त्या त्या भागात असणार्या भटक्या जनावरांंना लम्पीची बाधा होणार नाही, यासाठी ग्रामपंचायत, नगर पालिका, परिषद आणि मनपा यांन नियमित निरिक्षण करावेत, कायद मोडणार्या विरोधात त्यात्या भागातील पशूधन विकास अधिकारी यांनी गुन्हे दाखल करावेत, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
बाधिताच्या वियातून संसर्ग
लम्पी बाधित जनावरांच्या वियातून लम्पी रोगाच्या विषाणूचा प्रसार होत असल्याने जिल्ह्यात जनावरांचे विर्य संकलन करणार्या संस्थांनी त्यांचे काम थांबवावेत, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र, निरोगी वळू यांच्या मार्फत पशूपालकांना काम करून घेता, असे पशूसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.
अशी आहे आकडेवारी
जिल्ह्यात एप्रिल महिन्यांपासून आतापर्यंत 2 हजार 641 जनावरांना लम्पीचा संसर्ग झालेला असून यातील 185 जनावरे मृत पावली आहेत. तर 1 हजार 516 जनावरांनी लम्पीवर मात केलेली असून सध्या 940 सक्रिय जनावरे आहेत. यात 422 वासरांना लम्पीचा संसर्ग झाला आहे.