राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

लंप्पी या जनावराच्या साथीच्या रोगाची तालुका लघु चिकीत्सालयाकडून गंभीर दखल घेतली असून

बाधित जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकार्यांकडून उपचार सुरू करण्यात आले आहेत. तातडीने एक हजार लशींच्या डोसची मागणी करण्यात आली असल्याची माहिती डॉ. एस. जी. बन यांनी दिली.

राहाता शहरात गेल्या काही दिवसांपासून जनावरांवरील लंप्पी या रोगामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरे बाधित झाली होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. खासगी डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणावर उपचारावर शेतकर्यांची लूट होत होती व या साथीचा संसर्ग परिसरात वाढत असल्याने शेतकर्यांनी या प्रश्नी पशुवैद्यकीय विभागाने लक्ष घालण्याची मागणी केली होती. याप्रश्नी दैनिक सार्वमतने वाचा फोडताच संवर्धन विभागाने तात्काळ पावले उचलत तालुका लघु पशुचिकीत्सालय विभागाला साथ नियंत्रणाचे आदेश दिले.

राहाता येथील पशु विभागाच्या पथकाने परिसरातील बाधित जनावरांवर उपचारही सुरू केले असून या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी तातडीने एक हजार लसींच्या डोसची मागणी जिल्हा पशु विभागाकडे केली आहे.

तसेच अशा बाधित असलेल्या जनावरांची माहिती नागरिकांनी तातडीने तालुका लघु चिकीत्सालयाला कळवावी, असे आवाहन डॉ. एस. जी. बन यांनी केले असून या आजाराने जनावरे दगावत नसून त्यावर उपचार केल्यास ती पूर्ण बरी होतात. तरी अशा बाधित जनावरांची माहिती त्वरीत कळवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.