
भोकर |वार्ताहर| Bhokar
श्रीरामपूर तालुक्यातील तालुक्यातील खोकर येथे लम्पी आजाराने एका गायीचा मृत्यू झाल्याने परीसरात पशु पालकामध्ये भिती निर्माण झाली आहे. लम्पीवर उपचार करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याने पशु पालकांनी घाबरून न जाता आपल्या जनावरांना लम्पी सदृश लक्षणं दिसल्यास लागलीच जवळच्या पशुवैद्यकीय अधिकार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी विजय धिमटे यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात दि.20 सप्टेबर रोजी निपाणीवाडगाव शिवारातील एका गोपालकाने संशयीत लम्पीग्रस्त गाय खोकर शिवारात आणून सोडल्याचे काही नागरिकांनी त्यावेळी सांगितले होते. ती गाय नंतर खोकरफाटा शिवारातून वडाळामहादेव शिवारातील एका पेट्रोलपम्प परिसरात खोकरचे उपसरपंच दिपक काळे, ग्रामपंचायतीचे क्लर्क दादासाहेब चक्रनारायण आदिंसह ग्रामस्थांनी पकडून पशुवैद्यकीय अधिकार्यांना पाचारण करून ती गाय दाखविली. त्यावेळी संबंधित उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्या गायीला जास्त प्रमाणात गोचीड झाल्याने त्या गायीची त्वचा संशयित वाटत असल्याचा खुलासा करत त्या गायीच्या कानाला असलेल्या बॅचवरून संबंधित गोपालकाचा शोध घेत तिला त्या मालकाच्या स्वाधीन केले होते.
ही घटना ताजी असतानाच सुमारे दहा ते बारा दिवसांनंतर खोकर फाट्यापासून हाकेच्या अंतरावर गट नं.285 मध्ये वस्ती करून राहत असलेले उपसरपंच दीपक काळे यांची दुभती गाय लम्पीग्रस्त झाली. सुरूवातीचे चार दिवस तशी लक्षणं न दिसल्याने दीपक काळे यांनी जवळच्या खासगी पशुवैद्यकास पाचारण करत उपचार केले परंतु पाचव्या दिवशी त्या गायीला लम्पीची लक्षणं दिसू लागताच त्यांनी लागलीच सरकारी पशुवैद्यकीय अधिकार्यांशी सपर्क करत त्याप्रमाणे उपचार सुरू केले, परंतु दुर्दैवाने नंतरच्या पाच दिवस सरकारी वैद्यकीय अधिकार्यांनी सलग पाच दिवस सरकारी खर्चाने दररोज नियमीत उपचार केले.
परंतु दुर्दैवाने पाचव्या दिवशी ही लम्पीग्रस्त गायीचा मृत्यू झाल्याने या शेतकर्याचे सुमारे साठ हजारांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाल्याचे जाणकार सांगत असले तरी शासन दरबारी मात्र यापेक्षा कमी किंमत धरली जात असल्याने आता या शेतकर्यास किती नुकसान भरपाई मिळणार याकडे दुग्ध व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. या मृत गायीच्या शवविच्छेदनानंतर संबंधित पशुवैद्यकीय अधिकार्यांनी समक्ष हजर राहत त्या मृत गायीचा दफनविधी करण्यात आला.
सदरची बातमी परीसरात पसरताच परीसरातील पशुपालक व दुग्ध व्यावसायिकांत भीती व्यक्त होत असली तरी प्रशासन या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परिसरातील दुग्ध व्यावसायीक व पशु पालक यांनी घाबरून न जाता आपले जनावर संशयित वाटल्यास लागलीच संबंधित पशुवैद्यकीय अधिकार्यांशी संपर्क करावा, अशा आजारग्रस्त जनावरांना मोफत उपचार करून सर्वतोपरी दक्षता घेतली जाते, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता वेळीच प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी विजय धिमटे यांनी केले आहे.