568 लम्पी बळी जनावरांपोटी दीड कोटींची मदत

811 प्रस्ताव मंजूर || जिल्ह्यात 1 हजार 171 जनावरांचा मृत्यू
568 लम्पी बळी जनावरांपोटी दीड कोटींची मदत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात लम्पी संसर्ग रोगाने आतापर्यंत 1 हजार 171 जनावरे मृत पावली आहेत. या मृत्यू झालेल्या जनावरांपोटी पशु पालकांना पशुसंवर्धन विभागाकडून आर्थिक मदत देण्यात येेते. 1 हजार 171 पैकी 811 प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्यातील 568 शेतकर्‍यांना 1 कोटी 53 लाखांची भरपाई मिळाली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभाग (राज्य सरकार) यांच्याकडून देण्यात आली.

जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांपासून लम्पी या संसर्गजन्य रोगाचा फैलाव सुरू झाला आहे. प्रारंभी केवळ उत्तरेतील काही तालुक्यांत असलेला हा संसर्ग हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात पसरला. आजअखेर जिल्ह्यात 18 हजार 600 लम्पी बाधित जनावरे आढळली असून, त्यातील 1 हजार 171 जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनाने लम्पीने जनावरांचा मृत्यू झाल्यास शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर समिती नेमून हे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत.

1 हजार 171पैकी आतापर्यंत 811 मदतीचे प्रस्ताव समितीने मंजूर केले आहेत. त्यातील 568 शेतकर्‍यांना प्रत्यक्ष 1 कोटी 53 लाखांची मदत मिळाली आहे. उर्वरित मंजूर प्रस्तावांची मदतही लवकरच मिळणार आहे. 18 हजार 600 बाधित आतापर्यंत जिल्ह्यातील 218 गावांत 18 हजार 600 लम्पी बाधित जनावरे आढळली आहेत. त्यातील 11 हजार 676 (63 टक्के) जनावरे उपचाराने बरी झाली असून उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील 14 लाख 97 हजार 630 जनावरांचे लसीकरण पशुसंवर्धन विभागाने पूर्ण केले आहे. हे लसीकरणाचे प्रमाण 100 टक्के आहे.

अशी आहे मदत

लम्पीने जनावरांचा मृत्यू झाल्यास शासनाने खास बाब म्हणून पशुपालकांना मदत जाहीर केली आहे. त्यानुसार दुभत्या जनावरांना 30 हजार, बैल 25 हजार, तर वासरासाठी 16 हजार रुपयांची मदत दिली जाते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com