290 लम्पी बाधितांसह पाच जनावरांचा बळी

290 लम्पी बाधितांसह पाच जनावरांचा बळी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आता लम्पीचा संसर्गाचा वेग वाढला आहे. गुरूवारी नव्याने 290 लम्पी बाधितांसह 5 जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला असून यामुळे लम्पी बळींची संख्या आता 54 वर पोहचली आहे. दररोज नव्याने वाढणार्‍या लम्पीग्रस्तांच्या आकड्यामुळे लसीकरण करण्यात येणार्‍या आणि करणे आवश्यक असणार्‍या जनावरांचा आकडा वाढत आहे.

जिल्ह्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून जनावरांना लम्पी या चर्म रोगाचा संसर्ग वाढत आहे. आतापर्यंत 54 जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झालेला असून हा आकडा भविष्यात वाढण्याची भिती पशूसंवर्धन विभागाला आहे. दुसरीकडे आतापर्यंत 555 जनावरांनी लम्पीवर यशस्वी मात देखील केली असून सध्या उपचार सुरू असणार्‍या जनावरांची संख्या ही एका हजारांच्या पुढे आहे. जिल्ह्यातील 16 लाख पशुधनापैकी 1 हजार 656 जनावरांना लम्पीचा संसर्ग झालेला आहे. कालपर्यंत 164 गावात लम्पीपिडीत जनावरे होती. यामुळे या गावाच्या परिघात असणार्‍या पाच किलो मीटरपर्यंत 852 गावांतील 9 लाख 61 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यातील 6 लाख 4 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे पशूसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

लम्पीग्रस्त जनावरांसाठी छावण्या सुरू करा

जिल्ह्यात दिवसंदिवस लम्पी संसर्ग झालेल्या जनावरांची संख्या वाढत आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतकरी भयभित झाला आहे. अनेक ठिकाणी लम्पी झालेल्या जनावरांना रस्त्यावर, शेतात शेतकरी सोडून देत आहेत. यामुळे लम्पी संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नगर जिल्ह्यात लम्पीग्रस्त जनावरांसाठी छावण्या (कॅम्प) सुरू कराव्यात. या छावण्या सुरू करण्याची जबाबदारी सामाजिक संस्थांवर सोपवावी, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी केली. तसेच याबाबत पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे त्यांनी लक्ष वेधले असून पशूसंवर्धन मंत्र्याच्या जिल्ह्यात लम्पीग्रस्त जनावरांसाठी छावण्याचा प्रयोग झाल्यास तो राज्याला आदर्श ठरले, असे कर्डिले यांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com