तीन जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू

बाधित भागातून जनावरांच्या वाहतुकीवर बंदी
तीन जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात लम्पी स्किन आजाराचा विळखा घट्ट होतांना दिसत आहे. आतापर्यंत लम्पीची लागण झालेल्या जनावरांची संख्या 103 झाली असून यामुळे 86 गावांच्या परिसारातील पाच किलोमीटर भागाचे लसीकरण पशूसंवर्धन विभागाला करावे लागणार आहे. दरम्यान, आतापर्यंत राहुरी, राहाता आणि पाथर्डी तालुक्यातून प्रत्येकी एक गोवंशी जनावराचा लम्पीमुळे बळी गेला आहे.

लम्पी स्किन आजाराबाबत आता जिल्हा परिषदेसोबत राज्य सरकारचा कृषी आणि पशूसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला आहे. आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती गठीत करण्यात आली असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुकास्तरावर तहसीलदार समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हास्तरावरील समितीत झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पशूसंवर्धन उपायुक्त आणि पशूसंवर्धन अधिकारी यांचा समावेश राहणार आहेत.

तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, सहायक आयुक्त पशूसंवर्धन आणि पशूधन विकास अधिकारी यांचा समावेश राहणार आहे. या समित्या लम्पी आजाराच्या संनियंत्रणाचे काम करणार असून लसीकरण सोबत बाधित भागातून जनावरांची एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहतूक थांबवण्याचे आदेश काढण्यात आले आहे. या कामात दिरंगाई करून आजाराचा प्रार्दुभाव वाढवणार्‍यांवर दंडात्मक आणि अन्य कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येेरेकर यांनी स्वत: फिल्डवर उतरून बाधित भागात भेटी देत पशूसंवर्धन अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

दरम्यान, जिल्ह्यात दिवसंदिवस लम्पीचा प्रार्दुभाव वाढत असून बाधितांची संख्या आता 103 वर पोहचली आहे. 11 तालुक्यातील 86 गावांच्या पाच किलो मीटरच्या परिघात लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण पशूसंवर्धन विभागाने हाती घेतले आहे.

जिल्ह्यात लम्पीबाधित असणार्‍या भागातील पाच किलोमीटरच्या परिघात 1 लाख 9 हजार 924 संशयीत जनावरे असून त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहेत. त्यासाठी 82 हजार 200 लसी उपलब्ध झाल्या असून प्रत्यक्षात 63 हजार 87 जनावरांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती पशूसंवर्धन विभागाने दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com