पळून गेलेले प्रेमीयुगल चौथ्या दिवशी सापडले

पोलिसांची कामगिरी
पळून गेलेले प्रेमीयुगल चौथ्या दिवशी सापडले

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील चार दिवसांपूर्वी पळून गेलेले प्रेमी युगलाचा सुपा पोलिसांनी चार दिवसांत छडा लावून संबंधित तरुण व तरुणीस नातेवाईंकांचे ताब्यात दिल्याची घटना नुकतीच घडली आहे.

भोकर येथे राहत असलेली एक 19 वर्षीय तरुणी शनिवार दि. 30 जुलै रोजी आपल्या आजीसोबत पुणे येथे जात असताना नगर-पुणे महामार्गावरील पळवे परीसरातील हॉटेल विराज येथे गाडी थांबली, तेथे सदर तरुणीने पिण्यासाठी पाणी आणण्याचा बहाणा करून ती त्या गाडीतून उतरली. तेथे तिचा भोकर येथीलच प्रियकर मोटारसायकल घेऊन तेथे तिला पळवून घेवून जाण्यास तयार होता. आजीला काही समजायचे आत हे प्रेमीयुगल तेथून गायब झाले. हा प्रकार काहीवेळात आजीच्या लक्षात आला. परंतु तोपर्यंत उशीर झालेला होता.

आजीने नातेवाईकांशी संपर्क केला शोधाशोध झाली पण उपयोग झाला नाही. अखेर दि. 30 जुलै रोजी सुपा पोलीस ठाण्यात मुलगी गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार बोकावे यांनी लागलीच कर्तबगार पोलीस हवालदार खंडेराव शिंदे यांचेवर तपासाची जबाबदारी सोपवत तपास चक्रे फिरू लागली.

एकीकडे नातेवाईकांचा तपास सुरू होता तर दुसरीकडे पोलिसांची तपास चक्र फिरत होते. अखेर काल चौथ्या दिवशी म्हणजे मंगळवार दि.2 ऑगस्ट रोजी हे जोडपे शिरूर परिसरातील एका विटभट्टीवर त्या तरुणाच्या नातेवाईकांकडे असल्याची खबर मिळाली अन् जोडप्याचा तपास लागला आणि नातेवाईकांसह पोलिसांचाही जीव भांड्यात पडला. सुपा पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले. त्यानंतर दोन्ही बाजूचे जाबजबाब व नंतर नातेवाईकांत समझोता होऊन सदरच्या तरुणीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात सोपविण्यात आले तर तरुणास त्याच्या मामाच्या ताब्यात देण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com