
शिर्डी | शहर प्रतिनिधी
धार्मिक स्थळावरील भोंग्यांवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबा संस्थाननेही महत्वाचा निर्णय घेतला आहे. श्री साईबाबांच्या मंदिरावरील वर्षानुवर्षे सुरू असलेल्या लाऊडस्पीकरवरील.....
रात्रीची शेजारती तसेच पहाटेची काकडआरती सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार बंद करण्यात आली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी दिली असून आता साईमंदीरातील दैनंदिन ५ आरत्यापैकी ३ आरत्या लाऊडस्पीकरवर तर २ आरत्या विना लाऊडस्पीकरवर होणार आहे.
दरम्यान राज्यात मशिदीवरील भोंगे उतरविण्यात यावे यासाठी मनसेच्या वतीने राज्य सरकारला दि.३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दि.३ पर्यंत भोंगे उतरवले नाही तर दि. ४ ला राज्यात मशिदीच्या भोंग्यासमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा इशारा दिला होता. याप्रश्नी राज्य शासनाने सर्वपक्षीय बैठक घेऊन सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व धार्मिक तसेच इतरत्र कार्यक्रमात लाऊडस्पीकर बंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरास अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशाचे पालन करण्याचे पत्र देण्यात आले आहे.
श्री साई संस्थानाला प्राप्त झालेल्या पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी माहिती देतांना म्हणाल्या की, श्री साईबाबा संस्थानला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रात न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार श्री साईबाबा संस्थानच्या प्रथा, परंपरा यांंना कुठेही मुरड न घालता न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत आहे. काही विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट डेसीबल ध्वनीची मर्यादा दिली आहे. ती कुठेही क्रॉस न होऊ देण्याची दक्षता घेण्यात यावी अशा प्रकारची विनंती पोलीस प्रशासनाने साई बाबा संस्थांनकडे केली असल्याने त्या आदेशान्वये श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था दक्षता घेत आहे.
सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ५५ डेसिबल मर्यादा आहे. त्यानुसार साईमंदीरात दुपारची माध्यन्ह आरती, सकाळी ६.३०शिर्डी माझे पंढरपूर ही आरती आणि सायंकाळची धूपआरती लाऊडस्पीकर वर ५५ डेसिबल पर्यत ठेवण्यात आली आहे. तर रात्रीची शेजारती व पहाटची काकड आरती लाऊडस्पीकर वरून बंद करण्यात आली असून ती प्रथा परंपरेनुसार मंदिरात सुरू आहे. एकंदरीतच सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत संस्थान प्रशासनाच्या वतीने आणि मुस्लिम बांधव यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालन करत रात्री १० ते ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन साईबाबांचा सबका मालीक एक संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे.
दिवसाच्या चार आजान या लाऊडस्पीकरवर ५५ डेसिबल पर्यंत मर्यादा राखून कायम ठेवल्या आहे, तर पहाटेची आजान लाऊडस्पीकरवरुन बंद करण्यात आली आहे. यापुढेही शासनाच्या गाईड लाईनप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. तसेच शिर्डीतील सर्व सहा मस्जिदमध्ये भोंग्यांसाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घेण्यात आली असल्याची माहिती शिर्डी शहर जामा मस्जिद ट्रस्टचे सचिव बाबाभाई सय्यद यांनी दिली.