
बेलापूर |वार्ताहर| Belapur
काही दिवसांपूर्वी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध धार्मिक स्थळांवरील लाऊड स्पीकरचा कर्णकर्कश आवाज आणि त्यांचा कायदेशीर वेळेव्यतिरिक्त होणारा वापर याविषयी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना निवेदन दिले होते. यासंदर्भात पोलिसांनी संबंधितांना नोटीसाही दिल्या होत्या.
त्याच पार्श्वभूमीवर बेलापूर येथे एका लाऊड स्पीकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांच्या फिर्यादीवरून लाऊड स्पीकर चालक सोमनाथ साळुंके यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपीने कर्णकर्कश आवाजात लाऊड स्पीकर वाजवून सर्वोच्च न्यायालयाचे लाऊड स्पीकरचा आवाज आणि तो वाजवण्याची वेळ, याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि जनतेस पीडा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर वाजविण्यास सर्वोच्च न्यायालयाची बंदी आहे. तसेच लाऊड स्पीकरचा आवाज किती डेसिबलपर्यंत असावा, याचीही मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहे. यासंदर्भात विविध धार्मिक स्थळांना नोटिसा देण्यात येऊन समज दिलेली आहे. सदर कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती बेलापूर औट पोस्टचे हवालदार अतुल लोटके यांनी दिली आहे.