नुकसानग्रस्त शेती पिकांचे सरसकट पंचनामे करावेत

आ. कानडे यांची अधिकार्‍यांना सूचना
आ. कानडे
आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशा लेखी सुचना आ. लहु कानडे यांनी उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्यासह श्रीरामपूर व राहुरीचे तहसिलदार यांना दिल्या आहेत.

आ. कानडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शासनाने नुकतेच अतिवृष्टी खेरीज सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. असे असताना श्रीरामपूर तालुक्यात केवळ ओढ्याचे किंवा नदीचे पाणी गेल्याने नुकसान झालेल्या शेताचेच पंचनामे करण्याबाबतच्या सुचना देण्यात आल्याची बाब पढेगाव येथील शेतकर्‍यांनी निदर्शनास आणून दिली आहे. संबंधीत कामगार तलाठ्याशी बोललो असता तहसिलदार श्रीरामपूर यांनी तशा स्वरुपाचे पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले.

मागील 2-3 वर्षांपासून सततच्या पावसामुळे होणार्‍या शेती पिकांच्या नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळेच सदरचा विषय विधानमंडळामध्येही चर्चेसाठी आला होता. शासनाने आश्वासित केल्याप्रमाणे तसे परिपत्रक नुकतेच काढण्यात आले आहे. असे असताना सर्व सततच्या पावसाने होणार्‍या शेतींचे, बुजल्या जाणार्‍या विहिरींचे व शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे होणे आवश्यक आहे.

त्यासाठी आपण अधिकारी स्तरावर एकत्रितरित्या पाहणी करुन पंचनामे करण्याचे काम तातडीने सुरु करावे, याबाबत आपण काय नियोजन केलेले आहे, त्याची माहितीही मला अवगत करावी, असेही आ. कानडे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com