
लोणी |वार्ताहर| Loni
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील शांतीनगर मध्ये राहणारा अमान रुबाब खाटीक (वय 17) हा युवक सोमवारी दुपारी मित्रांसमवेत प्रवरा डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला. तोल गेल्याने तो पाण्यात बुडून दिसेनासा झाला. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. लोणी-कोल्हार रस्त्यावरील नाशिक पूल येथे पोहण्यासाठी अमान गेला खरा पण त्याला पोहता येत नव्हते.
इतर सर्वजण पोहताना बघून तोही कालव्याच्या कडेला बसून मित्रांसोबत आनंद लुटत होता. परंतु काही वेळाने त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. काही वेळातच तो पाण्यात बुडाल्याने दिसेनासा झाला. त्याचे मित्र घाबरून गेले. नंतर नातेवाईक व मित्रांनी त्याचा शोध घेतला मात्र तो मिळाला नाही. मंगळवारी त्याचा मृतदेह नाशिक पुलापासून काही अंतरावर मिळून आला. अमानने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्याच्या आकस्मिक जाण्याने त्याचे कुटुंबीय,नातेवाईक आणि ग्रामस्थांना मोठ्या दुःखाचा सामना करावा लागत आहे.