लोणीत मुसळे वस्ती भागात वृद्ध महिला निघाली करोना बाधित
सार्वमत

लोणीत मुसळे वस्ती भागात वृद्ध महिला निघाली करोना बाधित

लोणीतील रुग्णांची संख्या पोहचली 5 वर

Arvind Arkhade

लोणी|वार्ताहर|Loni

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक गावातील मुसळे वस्ती भागात कर्करोगग्रस्त वयोवृद्ध महिला शनिवारी करोना बाधित आढळल्याने लोणीकरांची चिंता वाढली आहे.

तीन दिवसांपूर्वी लोणी बुद्रुक गावात बँक अधिकारी महिलेसह 4 जण करोना बाधित आढळून आल्याने लोणी बुद्रुक व खुर्द ही दोन्ही गावे सात दिवस लॉकडाऊन करण्यात आली होती. त्यांच्या संपर्कातील बहुतांशी जणांचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याने लोणीकरांना दिलासा मिळत असतानाच लोणी-दाढ रस्त्यालगत असलेल्या मुसळे वस्ती भागातील 80 वर्षीय कर्करोगग्रस्त महिला शनिवारी करोनाबाधित आढळून आल्याने लोणीकरांची चिंता वाढली आहे. मुसळे वस्ती भाग आज प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

करोनाबाधित महिला कर्करोगग्रस्त असल्याने तिच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तिच्यामध्ये काही लक्षणे आढळून आल्याने प्रवरा कोव्हिड सेंटरमध्ये तिच्या घशातील स्राव घेऊन तपासणी केली असता ती करोना बाधित आढळून आली. या महिलेचे कुटुंब आणि आजूबाजूच्या काही लोकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.

शनिवारी रात्री 8 वाजता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.दरम्यान लोणी बुद्रुकमध्ये आता करोना बाधित रुग्णांची संख्या 5 वर पोहचली आहे. अगोदर बाधित निघालेल्या बारा वर्षीय मुलाच्या संपर्कात आलेल्या चार मुलांचे अहवाल काल निगेटिव्ह आले तर पुण्याहून परिचारिकेच्या बाधित मुलाला लोणीत घेऊन आलेल्या तरुणांचा अहवालही निगेटिव्ह आला.

आणखी काही व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. 15 जुलैपर्यंत दोन्ही लोणी गावे लॉकडाऊन करण्यात आली असून रुग्णांची संख्या वाढल्यास लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com