लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक आणि खुर्द गावात रविवारपासून चार दिवस जनता कर्फ्यू सुरू झाला असून त्यास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे.

लोणी बुद्रुक गावात सोमवारपासून जंतूनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे.

करोना रुग्ण संख्येत दुसर्या लाटेत राहाता तालुक्यात अनपेक्षित रुग्ण संख्या वाढत असल्याने शिर्डी, राहाता आणि लोणी या मोठ्या लोकसंख्येच्या गावातील रुग्ण संख्या लक्षात घेऊन प्रशासन आणि स्थानिक प्राधिकरण यांनी जनतेच्या सहकार्याने करोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले.

त्यात लोणी बुद्रुक आणि खुर्द गावातील रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के यांनी लोणी बुद्रुक आणि खुर्द ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि पोलीस अधिकारी यांच्या एकत्रित बैठक घेतल्या. त्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी विविध पर्यायांवर विचारविनिमय होऊन रविवार ते बुधवार चार दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय झाला.

दोन्ही ग्रामपंचायतींनी नागरिक, व्यापारी, व्यावसायिक यांना दोन दिवसांचा अवधी दिल्याने अत्यावश्यक वस्तूंची खरेदी- विक्री करण्यास वेळ मिळाला. परिणामी सर्व घटकांनी या जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. रविवार आणि सोमवार दोन्ही गावांतील औषधालये व आरोग्य सेवा वगळता संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.पुढील दोन दिवस असाच प्रतिसाद मिळण्याचा विश्वास प्रशासन आणि ग्रामपंचायतींना असल्याने करोनाची साखळी तोडण्यात नक्की यश येईल, अशी आशा आहे.

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने सोमवारपासून गावातील फळबाग शेतकर्यांच्या सहकार्याने त्यांचे फवारणीसाठीचे ट्रॅक्टर गावातील बाजारपेठा, मुख्य आणि अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, व्यापारी संकुले, नागरी वसाहतीमध्ये जंतूनाशक फवारणी सुरू केली. पुढील दोन दिवसांत संपूर्ण गाव निर्जंतूक करण्यात येईल.

यासाठी सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, ग्रामविकास अधिकारी कविता आहेर, सदस्य दिलीप विखे, भाऊसाहेब धावणे, रामनाथ विखे, प्रवीण विखे, दीपक विखे, सुभाष म्हस्के, कैलास विखे, गोरक्ष दिवटे, संतोष विखे, संभाजी विखे, अर्जुन बोरसे यांच्यासह सर्व सदस्य, आजी- माजी पदाधिकारी व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.