
लोणी(वार्ताहर)
लम्पिच्या संकटामुळे बंद करण्यात आलेला लोणीच्या जनावरांचा बाजार बुधवारी साडे तीन महिन्यानंतर पुन्हा सुरू झाला. पहिल्याच बाजारात सुमारे चार कोटींची उलाढाल झाली असून पशुपालक सुखावले आहेत.
लम्पि आजाराने संपूर्ण राज्यात जनावरांवर मोठे संकट ओढवले होते. हजारो गायी मृत्युमुखी पडल्या तर लाखो गायी आजाराने बाधित झाल्या. दुधाच्या उत्पादनातही मोठी घट झाली. राज्य सरकारने पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर लसीकरण सुरू केले. तरीही लम्पि आटोक्यात येण्यास मोठा कालावधी गेला. त्याचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यातील जनावरांचे सर्व बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेली साडे तीन महिने सर्व बाजार बंद राहिले.मात्र साथ आटोक्यात आल्याने व पशुपालकांचे नुकसान टाळण्यासाठी ना.विखे पाटील यांनी जनावरांचे बाजार सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. अहमदनगरच्या जिल्ह्याधिकार्यांनी राहाता बाजार समितीच्या प्रस्तावाला मंजुरी देत बुधवारी बाजार भरण्यास परवानगी दिली. अल्पकाळात शेतकरी आणि व्यापाऱ्यांपर्यन्त बाजार सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीने दिली. परिणामी बुधवारच्या पहिल्याच बाजारात पशुपालक आणि व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
गायींना चांगला भावही मिळाला. पहिल्याच बाजारात सुमारे चार कोटींची उलाढाल झाली. राहाता बाजार समितीचे प्रशासक खेडकर, सचिव उद्धव देवकर व कर्मचाऱ्यांनी बाजारात उपस्थित राहून शेतकरी व व्यापारी यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली. नगर, धुळे, सोलापूर, पुणे, नाशिक, उस्मानाबाद, औरंगाबाद तसेच गुजरात मधून अनेक व्यापारी जनावरे खरेदीसाठी लोणी येथे आले होते. यावेळी बाजार समितीचे प्रशासन,शेतकरी व व्यापारी यांनी बाजार सुरू केल्याबद्दल ना.विखे पाटील यांना धन्यवाद दिले.