लोणी परिसरात सर्प नष्ट होण्याच्या मार्गावर; शेतकर्‍यांची चिंता वाढली

लोणी परिसरात सर्प नष्ट होण्याच्या मार्गावर; शेतकर्‍यांची चिंता वाढली

लोणी |वार्ताहर| Loni

धामण सारखा सर्प शेतकर्‍यांचा मित्र मानला जातो. तो शेती पिकाचे नुकसान करणार्‍या उंदरांचा फडशा पडतो म्हणून तो मित्र मानला जातो. गेल्या काही वर्षांत या परिसरात बिबटे आणि मोरांचे आगमन झाले. मोरांची संख्याही झपाट्याने वाढली. मात्र हे मोर सर्पांची सहजपणे शिकार करू लागले आणि दररोज दिसणारे विविध जातींचे सर्प आता अपवादाने दिसत आहेत. या परिसरात धामण जातीच्या सर्पाची मोठी संख्या होती आणि ती आता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

भंडारदरा धरणाच्या लाभ क्षेत्रातील लोणी बुद्रुक, खुर्द, हसनापूर, चंद्रपूर या बागायती गावांबरोबरच गोगलगाव, सादतपूर, औरंगपूर, चिंचपूर ही लोणी लगतची अनकमांडची जिरायती गावे आहेत. या भागात सर्पांची संख्या मोठी. शेतकर्‍यांना विविध प्रकारचे सर्प अगदी सहजपणे दिसून येत असत.त्यातच धामण जातीच्या सर्पाची संख्या त्यापैकी सर्वाधिक. आठ-दहा वर्षांपूर्वी बिबट्यांचे या भागात आगमन झाले. त्यापूर्वी मोर होतेच पण संख्या नगण्य होती.

बिबटे आले आणि त्यांनाही पोषक वातावरण मिळाल्याने ते इथेच रमले. त्यांनी आपल्या कुटुंबाचा विस्तारही वेगाने केला. कधी न बघितलेला बिबट्या आता सहज दर्शन देऊ लागला आहे. अनेक ठिकाणी माणसांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या. बिबट्याची कुत्री, शेळ्या, कोंबड्या, वासरे यांची शिकार करून आपली भूक भागवली. पूर्वी प्रत्येक वस्तीवर एक-दोन कुत्री असायची. आता कुत्री राहिली नाहीत. शेळ्या वाचवण्यासाठी शेतकर्‍यांनी त्यांना तारीचे कुंपण करून घेतले आहे. बिबट्याने आता भूक भागवण्यासाठी कोल्हे आणि मोरांकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसते.

या परिसरात सर्पांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे कारण शोधले असता असे लक्षात आले की, मोरांकडून त्यांची शिकार होऊ लागली आहे. मोर हे टोळक्याने फिरतात. झाडावरची बसतात. तेथून सर्पांची हालचाल टिपतात आणि अचानक हल्ला करून त्यांची डोळे फोडतात. त्यानंतर टोळक्याने त्याच्यावर ताव मारतात. एकीकडे मोरांकडून सर्पांची शिकार होत असताना टोळक्याने फिरणार्‍या मोरांवर झडप घालून बिबटेही त्यांची शिकार करीत आहेत. मात्र सावध होऊन मोर हवेत उडून झाडाचा आधार घेत असल्याने त्यांची संख्या टिकून आहे.

एकूणच काय तर जीवो जीवस्य जीवनम या न्यायाने एक जीव दुसर्‍या जिवावर अवलंबून असल्याने जो तो आपली पोटाची भूक भागवीत आहे. निसर्गानेही व्यवस्था निर्माण केली असली तरी त्याचा फटका शेतकर्‍याला बसताना दिसत आहे. उसासह गहू, हरभरा, मका, सोयाबीन व इतर कडधान्यांच्या पिकांचे उंदरांपासून संरक्षण करणारे सर्प या परिसरातून नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकर्‍याला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. बिबट्यांची दहशत, मोरांकडून होणारे शेती पिकांचे नुकसान या समस्या समोर असताना आता शेतकर्‍याचा मित्रही त्याला सोडून जात असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.

Related Stories

No stories found.