लोणी खुर्दमध्ये पाच तर हसनापूर मध्ये दोघे नवे बाधित
सार्वमत

लोणी खुर्दमध्ये पाच तर हसनापूर मध्ये दोघे नवे बाधित

Arvind Arkhade

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात मोठ्या संख्येने करोना बाधित आढळून येत आहेत. सोमवारी येथे पाच जण बाधित आढळून आले. तर शेजारच्या हसनापूर मध्ये आणखी दोघांना करोनाचा संसर्ग झाला. लोणीतील बाधितांची संख्या अवघ्या एक आठवड्यात 37 वर पोहचली आहे.

गेल्या महिन्यापर्यंत गावात एक जरी बाधित निघाला तर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून तेथील व्यवहार व नागरिकांची ये-जा बंद करण्यात येत असे. आता तसे काहीच होताना दिसत नाही. पोलीस आणि ग्रामपंचायतींची कारवाई सुद्धा होत नसल्याने नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे कुठेच पालन होत नाही. चेहर्‍यावर मास्क फक्त नावापुरता लावला जातो.

याचा परिणाम दिसू लागला असून लोणी खुर्द गावात दररोज बाधित आढळून येत आहेत. लोणी बुद्रुकमध्ये मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे. रविवारी प्रवरानगर येथील शांतिनाथ मंगलकार्यालया जवळच्या वसाहतीत दोन व्यक्ती बाधित आढळल्या. गावातील आशीर्वादनगर मधील एक परिचारिका, संगमनेर येथे नोकरीत असलेली एक व्यक्ती व मापारवाडी रस्त्यावरील एक व्यक्ती करोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले.

रविवारी देखील प्रवरानगर भागातील दोन व्यक्ती बाधित आढळल्या होत्या.लोणीजवळच्या हसनापूर गावातील भाने वस्तीत सतत बाधित आढळून येत आहेत. सोमवारी येथे आणखी दोन व्यक्ती बाधित आढळून आल्या. हसनापूर गावात फक्त एकाच व्यक्तीला आजपर्यंत संसर्ग झालेला आहे. मात्र भाने वस्ती आणि शृंखला हॉस्टेल परिसरात दहा पेक्षा अधिक व्यक्ती आतापर्यंत बाधित आढळून आल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com