लोणीत नव्याने 8 जणांना करोना संसर्ग
सार्वमत

लोणीत नव्याने 8 जणांना करोना संसर्ग

बाधितांची संख्या 45 वर पोहचली

Arvind Arkhade

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात मंगळवारी 7 जणांना तर बुद्रुकमध्ये एकाला करोना संसर्ग झाला. शेजारच्या दुर्गापूर गावातही एक व्यक्ती बाधित आढळून आली. लोणीतील बाधितांची संख्या आता 45 वर पोहचली आहे.

लोणीमध्ये करोनाचा विळखा दिवसोंदिवस घट्ट होताना दिसत आहे.दररोज वाढणारे बाधित चिंतेचा विषय ठरत आहेत. सोमवारी लोणी खुर्द गावातील प्रवरानगर परिसरातील शांतीनाथ मंगलकार्यालयजवळील वसाहतीत दोन व्यक्ती बाधित आढळल्या होत्या.

मंगळवारी त्यांच्या संपर्कातील आणखी दोन व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाला. तर येथील नेहरूनगर भागातील 4 व्यक्ती बाधित आढळून आल्या. लोणी- बाभळेश्वर रस्त्यावरील आहेर वस्तीवरील एका व्यक्तीला करोना संसर्ग झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

लोणी बुद्रुक गावातही काही दिवसांच्या विश्रातीनंतर बळीनारायण वस्तीवरील एका व्यक्तीला करोनाची बाधा झाली. ही व्यक्ती प्रवरा रुग्णालयात नोकरीला आहे. लोणी जवळच्या दुर्गापूर गावात आतापर्यंत करोनाचा संसर्ग झालेला नव्हता. मात्र मंगळवारी प्रवरा रुग्णालयात नोकरीला असलेली गावातील एक व्यक्ती करोना बाधित आढळून आली.

लोणी खुर्द गावात दररोज नवे बाधित आढळून येत असून लोणी बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावांतील आतापर्यंत 45 व्यक्ती करोना बाधित झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लोणी खुर्द गावाने यात आघाडी घेतली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळावे,मास्कचा सक्तीने वापर करावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के व दाढ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीपाद मैड यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com