लोणीत एका दिवसात 21 बाधित
सार्वमत

लोणीत एका दिवसात 21 बाधित

बाधितांची संख्या पोहचली 66 वर

Arvind Arkhade

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द आणि बुद्रुक गावांमध्ये करोना बाधितांचा आकडा वेगाने वाढत असून बुधवारी एकाच दिवशी 21 जण बाधित निघाले तर दोन्ही गावच्या बाधितांची संख्या 66 वर पोहचली.

लोणी बुद्रुक व खुर्द ही अस्तित्वाने वेगळी असली तरी इथले व्यवहार आणि एकूणच दैनंदिन जीवन तसे एकमेकांशी जोडलेले आहे. व्यवसाय, नोकरी, व्यापार, शिक्षण यासाठी इथे शेकडो नागरिक राहतात ज्यांची नोंद या गावांमध्ये नाही.

मोठ्या लोकसंख्येची ही गावे करोनाच्या विळख्यात अडकली तर त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसेल. गेल्या आठ-दहा दिवसांत इथं वाढलेला करोना संसर्ग चिंता वाढवणारा आहे. मंगळवारपर्यंत 45 जण करोना बाधित होते. बुधवारी हा आकडा आणखी 21 ने वाढला.

लोणी खुर्द गावातील कोरडे गल्लीत बुधवारी 6 जणांना करोनाचा संसर्ग झाला. तर बाभळेश्वर रस्त्यावरील आहेर वस्तीवर मंगळवारी एक व्यक्ती बाधित आढळून आला होता.त्याच्या कुटुंबातील 7 जण बुधवारी बाधित आढळून आले. प्रवरानगर येथील दोघे जण पूर्वीच्या बाधितांच्या संपर्कात आल्याने बुधवारी बाधित झाल्याचे स्पष्ट झाले.

लोणी बुद्रुक गावातील प्रसिद्ध किराणा व भुसार मालाचे व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबातील 4 व्यक्तींसह त्यांचा वाहक असे 6 व्यक्ती करोना बाधित निघाले. या व्यापार्‍याची सून रक्षाबंधनसाठी माहेरी गेली होती. तिने एक दिवस तेथे मुक्कामही केला पण तेथील काही व्यक्तींना करोनाचा संसर्ग झालेला असल्याने माहेरहून परतल्यावर काही दिवसांत ही महिला बाधित आढळून आली.

त्यामुळे कुटुंबियांची करोना तपासणी केली असता इतर व्यक्ती बाधित निघाल्या. दरम्यान किराणा,औषधालय या दुकानात काम करणारे कामगार आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती मात्र सध्या तरी निगेटिव्ह आल्या आहेत.या कुटुंबातील एक व्यक्ती दंत वैद्यक असून तेही बाधित आढळल्याने त्यांच्याकडे गेल्या काही दिवसांत उपचारासाठी गेलेल्या रुग्णांचीही तपासणी केली जात आहे. लोणीकरांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. अशीच परिस्थिती आणखी एक आठवडा राहिली तर दोन्ही गावे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com