लोणीत करोनाने एकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील 6 जण संक्रमित
लोणीत करोनाने एकाचा मृत्यू

लोणी|वार्ताहर|Loni

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे मंगळवारी आढळलेल्या करोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील 6 जण बुधवारी बाधित आढळून आले. जवळच्या हसनापूर गावातही एकाला करोनाची बाधा झाली.

लोणी बुद्रुक गावात मंगळवारी एकाच इमारतीत 12 करोना बाधित आढळले होते. त्याचवेळी लोणी खुर्द गावातील आशीर्वादनगरमधील एक व्यक्तीही बाधित निघाली होती. त्या व्यक्तीला प्रवरा कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले असताना बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. आरोग्य यंत्रणेने त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगितले. काल या व्यक्तीच्या कुटुंबातील सहा जणांचे स्राव तपासल्यानंतर त्याची पत्नी, बहीण, मुलगा, सून आणि नातू बाधित असल्याचे दिसून आले.

लोणी जवळच्या हसनापूर गावठाणमध्ये बुधवारी करोनाने शिरकाव केला. गावाच्या हद्दीत पण संगमनेर रस्त्यालगत काही दिवसांपूर्वी सहा बाधित व्यक्ती आढळून आले होते. पण त्यांचा गावाशी कोणताच संपर्क नव्हता. आत्तापर्यंत गावात मात्र एकही बाधित व्यक्ती नव्हता.

हसनापूर सारख्या गावात एकही व्यक्ती करोना बाधित आढळून न आल्याने हा कौतुकाचा विषय ठरला होता.पण काल शेतकरी असलेल्या एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्याने प्रशासन आणि हसनापूर ग्रामपंचायतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

या व्यक्तीला बाधा कुठून झाली याचा शोध घेण्याचे आव्हान त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे. लोणी बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायतीने आठवड्यातून तीन दिवस होणारी फळे आणि भाजीपाल्याची विक्री रविवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com