
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्हा विभाजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिर्डीमध्ये उभ्या राहणार्या विविध सरकारी कार्यालयांच्या इमारती पाहता जिल्हा विभाजनानंतर शिर्डी हे मुख्यालयाचे ठिकाणही निश्चित झाल्याचे स्पष्ट होते. आता फक्त जिल्हा विभाजनाची योग्य तारीख व वेळ जाहीर होण्याची प्रतिक्षा आहे. सध्याची स्थिती पाहता लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा विभाजन होण्याचे संकेत असल्याचे भाजप आ.राम शिंदे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आ. शिंदे यांच्यावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या बुधानी मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. बुधानी मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आ. शिंदे काल रात्री झेलम एक्सप्रेसने रवाना झाले. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, प्रदेश चिटणीस अरुण मुंडे, सुरेंद्र गांधी, अनिल मोहिते आदी उपस्थित होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी कोणतेही वाद नाहीत, पूर्वी चहाच्या पेल्यातील वादळ होते.
मला जी भूमिका पटली ती मी मांडत असतो. बहुसंख्य नेत्यांचे दौरे, कार्यक्रम शिर्डीत होत आहेत. दक्षिण भागात कार्यक्रम होत नाहीत. ही कार्यकर्ते, नागरिकांची भावना आहे. आता पूर्वी शिर्डीमध्ये केवळ अतिरिक्त पोलिस अधीक्षकांचे कार्यालय होते. नंतर आरटीओ आता अतिरिक्त जिल्हाधिकार्यांचे कार्यालय झाले, महसूल भवन उभारले जात आहे. याचाच अर्थ सर्व प्रमुख कार्यालये शिर्डीमध्ये उभारले जात आहेत. त्यामुळे जिल्हा विभाजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यालयाचे शिर्डी हे ठिकाणही निश्चित झाले आहे. आता केवळ विभाजनाची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे, ते देखील लोकसभा निवडणुकीपूर्वी होईल, असे संकेत असल्याचे आ. शिंदे म्हणाले.
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे मंजूर झालेले मेष महामंडळाचे कार्यालय हे राज्याचे मुख्यालय आहे. परंतु ढवळपुरी हे ठिकाण गैरसोयीचे आहे. त्याठिकाणी राज्यभरातून नागरिक येणार आहे. ढवळपुरीचे ठिकाण हे घाई घाईन झालेल आहे, त्यामुळे ते तिथून स्थलांतरित होणे आवश्यक आहे, त्याबद्दल दुमत नाही अशीही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
नामांतर लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लागेल
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा केली. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी पुन्हा पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नामांतराचा विषय लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लागेल, अशी अपेक्षा आ. शिंदे यांनी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी खा. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आ. संग्राम जगताप यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले. त्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आगरकर म्हणाले, खा. विखे विकासाचे चांगले काम करतात. त्यांनी विकास कामांकडे लक्ष द्यावे. संघटनात्मक जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे. ती आम्ही पार पाडू. आगरकर यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांनी खा. विखे यांना अप्रत्यक्षपणे खा. विखे यांना संघटनात्मक बाबीत लक्ष न घालण्याचा टोला लगावल्याचे मानले जाते.