अवैध धंदे बंद न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमरण उपोषण

शिर्डीतील जितेश लोकचंदानी यांचा इशारा
अवैध धंदे बंद न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमरण उपोषण

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

जागतिक देवस्थान असलेल्या शिर्डी शहरात दिवसेंदिवस अवैध धंदे वाढत असून आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राची बदनामी होत चालली आहे.

त्यामुळे येथील अवैध धंदे त्वरित बंद व्हावेत अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना निवेदनाद्वारे शिर्डी येथील पत्रकार जितेश लोकचंदानी यांनी दिला आहे.

जितेंद्र लोकचंदानी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असून शिर्डीत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी येथे स्वतंत्र पथक त्यासाठी निर्माण करून शिर्डी व परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी श्री. लोकचंदानी यांनी 26 जानेवारीपासून शिर्डी पोलीस स्टेशनसमोर तीन दिवस उपोषण करणार असल्याचा व या तीन दिवसांत सदरची मागणी पूर्ण नाही झाली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

शिर्डी हे श्री साईबाबांंमुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले असून येथे देश-विदेशातून साईभक्त दर्शनाला येत असतात. त्यामुळे येथे गेल्या काही वर्षापासून दारू विक्रीचे परवाने दिले जात नाही. मात्र तरीही येथे सर्रासपणे अवैध दारू विक्री होत आहे. त्याचप्रमाणे येथे दारू बरोबरच मटका, जुगार, गांजा विक्री, अवैध वेश्या व्यवसाय असे अनेक अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत.

शिर्डीला पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे हे नव्याने बदलून आले. त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, मात्र त्याही फोल ठरल्या आहेत. येथील अवैध धंदे बंद होण्यासाठी व पाकीटमारी बंद व्हावी यासाठी गेल्या बारा वर्षांपासून विविध निवेदन तसेच उपोषणे केली व त्याविरोधात लढत आहेत. मागील वर्षी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांना विनंती अर्ज केला होता.

त्यानंतर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र मुख्यमंत्री यांचे सचिव यांनी करोनामुळे आपण उपोषण करू नये, आपल्या मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासन मुंंबईत दिले होते. त्यामुळे उपोषण स्थगित केल्यानंतर करोना काळात मी उपोषणाचा मार्ग स्थगित ठेवला होता. मात्र तरीही या काळात तसेच अद्यापही शिर्डी येथे अवैध धंदे मोठ्या तेजित सुरू आहे.

येथे पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक नव्याने बदलून आले तरीही येथे अवैध धंदे सुरूच आहेत. यावर आळा बसावा यासाठी शिर्डी येथे कर्तव्यदक्ष अशा पोलिसांचे एक स्वतंत्र पथक निर्माण करावे व येथील अवैध धंदे त्वरित बंद होण्याचा प्रयत्न करावा. माझी मागणी मान्य झाली नाही तर मी शिर्डी पोलीस स्टेशन समोर 26 जानेवारी 2021 पासून उपोषण करणार आहे.

तीन दिवस येथे उपोषण करणार असून जर या काळातही माझी मागणी पूर्ण झाली नाही तर चौथ्या दिवसापासून मुंबईत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या शासकीय बंगल्यासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जितेश लोकचंदानी यांनी या निवेदनातून दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com