नगर आणि शिर्डी मतदारसंघासाठी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे निरीक्षक

लोकसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी
चंद्रकांत हंडोरे | Chandrakant Handore
चंद्रकांत हंडोरे | Chandrakant Handore

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

भाजपच्या विरोधात उभ्या राहिलेल्या ‘इंडिया’ आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने राज्यात लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक तयारीचा भाग म्हणून काँग्रेसने राज्यातील 42 लोकसभा मतदारसंघांत निरीक्षक आणि समन्वयक नेमले आहेत. हे निरीक्षक लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतील. याशिवाय मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि संघटनेची शक्ती याचा आढावा घेऊन त्याचा अहवाल येत्या 15 ऑगस्टपर्यंत प्रदेश काँग्रेसला सादर करणार आहेत. त्यात अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे काँग्रेसने जाहीर केले असले तरी पक्षाने मुंबईतील सहा जागा सोडून उर्वरित सर्व लोकसभा मतदारसंघांची चाचपणी सुरू केली आहे. पुढील वर्षांत एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे निवडणुकीला जेमतेम सहा ते आठ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. 2014 आणि 2019 च्या मोदी लाटेत काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसचे अनुक्रमे दोन आणि एक खासदार निवडून आले होते. गेल्या दोन निवडणुकीतील नामुष्कीजनक लाजिरवाणा पराभव टाळण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच कंबर कसली आहे. त्यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडे प्रत्येकी दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षकांची यादी घोषित केली. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती आणि सातारा लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे आमदार कुणाल पाटील आणि भाई जगताप यांना निरीक्षक म्हणून नेमले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री विश्वजितक कदम तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर मतदारसंघात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. तर ठाणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी मंत्री अस्लम शेख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, नंदुरबार आणि धुळे लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री वसंत पुरके, जळगाव आणि रावेरसाठी माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगडसाठी माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. भिवंडीसाठी विश्वजित कदम, सातारा आणि कोल्हापूरसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर हिंगोली आणि परभणीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निरीक्षक म्हणून नेमले आहे.

अन्य मतदारसंघासाठी निरीक्षक पुढीलप्रमाणे : विजय वडेट्टीवार- भंडारा गोंदिया, नसीम खान-औरंगाबाद, अस्लम शेख-पालघर, प्रणिती शिंदे-मावळ, कुणाल पाटील-शिरूर, हुसेन दलवाई- माढा आणि सांगली

राज्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी निरिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. हे निरिक्षक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, पक्ष संघटनेची ताकद या सर्वांचा अभ्यास करून 15 ऑगस्टपर्यंत प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करतील. त्यानंतर या अहवालावर चर्चा केली जाईल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com