लॉकडाऊनमध्ये मोकाट फिरणार्‍यांना दाखवा सदोष मनुष्यवधाचा कोलदांडा

नागरिकांची मागणी
लॉकडाऊनमध्ये मोकाट फिरणार्‍यांना दाखवा सदोष मनुष्यवधाचा कोलदांडा

राहुरी फॅक्टरी |वार्ताहर| Rahuri Factory

संपूर्ण जगावर ओढवलेल्या करोनाच्या संकटाने महाराष्ट्र राज्यातही धुमाकूळ घातला आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा करून लाखो रुपये खर्च करून देखील रोज लोक मृत्यूमुखी पडत आहेत. शासनाने सर्वांच्याच हितासाठी काही निर्बंध जारी केले आहेत. मात्र, काही मोकाट फिरणारे हे आदेश अक्षरशः पायदळी तुडवित आहेत.

करोनाची लक्षणे असताना देखील अनेक महाभाग मला काहीच नाही, अशा अविर्भावात रोज सार्वजनिक ठिकाणी हिंडून करोनाचे सुपरप्रेडर ठरत आहेत. अशा लोकांना आता पोलीस दलामार्फत सदोष मनुष्यवधाचा कोलदांडा दाखविण्याची मागणी पुढे येत आहे.

या आजाराची दाहकता ज्या कुटुंबातील व्यक्ती गमावली त्यांनाच कळत आहे. हे संकट कोणत्याही एका जातीधर्माच्या लोकांवर नाही तर समस्त मानव जातीवर ओढवले आहे.अशावेळी अनेक लोक जातपात बाजूला ठेवून एकमेकांना धीर देत आहेत. एकमेकांसाठी आपापल्या देवाकडे प्रार्थना करीत आहेत. अनेक वैद्यकीय, सामाजिक, पोलीस, शिक्षण, राजकीय, प्रसार माध्यमे, इतर अनेक सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती बडेजाव न करता रुग्णांची सेवा करीत आहेत. याउलट काही बेफिकीर नागरिक या संकटकाळाचा गैरफायदा घेत आहेत. कुणी औषधांचा काळाबाजर करताहेत, कुणी बोगस औषधे निर्माण करीत आहेत, काही उपचाराच्या नावाखाली लाखो रुपये उकळत आहेत. तर काही कोव्हिड सेंटरच्या नावाखाली आपली तुंबडी भरत आहे.

शासनाच्या निर्बंधाचा भाग म्हणून सर्वत्र लावण्यात आलेला लॉकडाऊन हातावर पोट असणार्‍यांना अत्यंत जिकरीचा ठरला आहे. मात्र, तसाच काहींच्या कमाईचा साधन झाला आहे. या सर्व गदारोळात दिवसेंदिवस करोना वाढतच असताना काही बेदरकार नागरिक राजरोसपणे विना मास्क, विना सॅनिटायझर, अत्यंत निष्काळजीपणाने सार्वजनिक ठिकाणी हिंडत आहेत. काही तर लक्षणे असतानाही आपली दुकानदारी सुरू ठेवून आहेत. ही निष्काळजीपणे मोकाट फिरणारी माणस खर्‍या अर्थाने करोनाची सुपरस्प्रेडर ठरत आहेत.

करोनाचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे दिसत असल्याने अशाप्रकारे सुपरस्प्रेडर ठरणार्‍या या मोकाटांना कंट्रोल करण्यासाठी आता पोलीस खात्याचा हिसका दाखविण्याची वेळ आली आहे. लोकांच्या जीवाशी खेळणार्‍या अशा लोकांविरुद्ध थेट सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com