लॉकडाऊनमध्ये संचारबंदीचे उल्लंघन

60 वाहने जप्त : श्रीरामपूर पोलिसांची कारवाई
लॉकडाऊनमध्ये संचारबंदीचे उल्लंघन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची तब्बल 50 ते 60 वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. करोनाच्या पार्श्वभूमिवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

श्रीरामपूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजी रोड, महात्मा गांधी चौकासह श्रीरामपूर हद्दीतील प्रमुख मार्गांवर व चौकांमध्ये वेळोवेळी नाकाबंदी करून या कारवाया करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये विविध प्रकारच्या दुचाकीसह बुलेट, तसेच मोठ्या खाजगी वाहनांचा समावेश आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदीचा आदेश देण्यात आले आहेत. असे असताना अनेक नागरिक या ना त्या निमित्ताने विनाकारण रस्त्यावर येतात.

भाजी खरेदी, किराणामाल यांच्यासह मेडिकलमधून औषधे घेण्याचे कारण देत लोक बाहेर पडत आहेत. बहुतांश नागरिक खोटी व चुकीची माहिती देऊन विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या जुन्या चिठ्ठ्या घेऊन बरेच नागरिक रस्त्यावर येत आहेत. श्रीरामपूर पोलिसांनी सातत्याने केलेल्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये आजाराबद्दल गांभीर्य वाढले असून मोठ्या प्रमाणावर वाहने जप्त केल्यामुळे अनावश्यक नागरिक रस्त्यावर येणे बंद झाले आहेत.

सुरुवातीच्या काळात दोन ते तीन दिवसांनंतर जप्त केलेली वाहने सोडण्यात येत होती. मात्र आजाराचा संसर्ग वाढत असूनही नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत होते. यावर उपाययोजना म्हणून संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये स्थानिक राजकीय पुढारी, नगरसेवक, आमदार तसेच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांची ओळख सांगत मध्यस्थाकडून गाड्या सोडवण्यासाठी विनंती वजा दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र पोलिसांनी कोणालाही न जुमानता कारवाई सुरू ठेवत जप्त केलेली वाहने ताब्यातच ठेवली आहेत. जप्त करण्यात आलेली वाहने संचारबंदी संपल्यानंतर म्हणजेच तीन जूननंतर संबंधितांना मिळतील, असे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com